जालन्यातील भोगगावमध्ये शेतवस्तीवर बिबट्याची दहशत; एका शेळीचा फडशा, दुसरी गंभीर जखमी

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या भोगगाव येथील अर्जुन रतन पंडुरे यांच्या शेतवस्तीवर रविवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करून एका शेळीचा फडशा पाडला. तर बिबट्याच्या हल्ल्यात दुसरी शेळी गंभीर जखमी झाली आहे.

शेळ्यांच्या ओरडण्याने बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या अर्जुन यांना जाग येऊन शेळ्या का ओरडतात ते पाहण्यासाठी ते बाहेर गेले. त्यावेळी तिथे त्यांना बिबट्या दिसूला. बिबट्या दिसताच घाबरलेल्या अर्जुन यांनी पत्र्याच्या शेडमध्ये आश्रय घेतला. शेडमध्ये गेल्यावर गावात मोबाईल फोन लावून घटना सांगताच गावकर्‍यांनी शेतवस्तीकडे धाव घेतली. गावकरी येईपर्यंत बिबट्याच्या अंगावर बॅटरी चमकवत जोरजोराने ओरडल्याने बिबट्याने धूम ठोकली. बिबट्या परत येईल, या भीतीमुळे सकाळपर्यंत गावकरी वस्तीवरच थांबून होते. त्यानंतर गावकर्‍यांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिली.

भायगव्हान शिवारात 29 जुलैला मनोहर एसलोटे हे बांधावर शेळ्या चारत असताना उसाच्या शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने एका शेळीवर हल्ला केल्याची घटना घडली होती. गंभीर जखमी शेळीचा दोन दिवसानंतर मृत्यू झाला होता. शेळीवर केलेल्या हल्याने जवळच असलेले मनोहर एसलोटे यांनी हातातील कुर्‍हाडीने बिबट्याच्या मानेवर वार केल्याने बिबट्या देखील जखमी झाला होता. घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण नंतर 10 दिवसांत भोगगाव येथे बिबट्याने शेतवस्तीवर हल्ला केला आहे. या घटनेने भोगगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. तसेच वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.