Lionel Messi India Tour – मेस्सीच्या कार्यक्रमातील राडा; ऑर्गनायझरला 14 दिवसांची पोलीस कोठडी

लिओनल मेस्सी हिंदुस्थानात आला आणि कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये राडा झाला. मेस्सीला पाहण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये चाहत्यांनी मोजले. परंतू मेस्सीला पाहता आले नाही, त्यामुळे संतापलेल्या चाहत्यांनी स्टेडियमची तोडफोड केली खुर्च्या तोडल्या, बाटल्या फेकल्या मिळेल त्या वस्तूंची नासधुस केली. याप्रकरणी ऑर्गनायझर सताद्रु दत्ताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला आता बिधाननगर न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टोटल गंभीर क्रिकेट!

अर्जेंटिनाचा कर्णधार आणि जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सी त्याच्या सहकाऱ्यांसह तीन दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर आला आहे. सर्व प्रथम तो कोलकात्यात पोहचला. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सॉल्ट लेक स्टेडियमवर मोठ्या संख्येने चाहते जमा झाले होते. मात्र, अवघ्या पाच मिनिटात मेस्सी स्टेडियममधून निघून गेला. त्यामुळे संतापलेल्या चाहत्यांनी स्टेडियमची नासधुस केली. याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख ऑर्गनायझर सताद्रु दत्ता याला ताब्यात घेतलं होतं. रविवारी (14 डिसेंबर 2025) त्याला न्यायालयात हजर केले असला, न्यायाधीशांनी त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.