“त्याने माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला अन्…”, अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट; पुजाऱ्याचा घृणास्पद प्रकार केला उघड

प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट लिशालिनी कनरन हिने धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. मलेशियातील एका मंदिरामध्ये तिच्यासोबत घृणास्पद प्रकार घडल्याचा दावा लिशालिनी हिने सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट करून केला. मंदिरातील पुजाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप करत तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार कथन केला आहे. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रारही दाखल केली असून पोलीस फरार पुजाऱ्याचा शोध घेत आहेत.

लिशालिनी कनरन हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गेल्या शनिवारी एक पोस्ट केली. यात तिने आपल्यासोबत मलेशियातील मरिअम्मन मंदिरामध्ये घडलेला प्रकार सांगितला. मंदिरात घडलेला प्रकार लोकांना कळताच तिने याबाबत सविस्तर पोस्ट करून माहिती दिली. मंदिरात घडलेला प्रकार सांगणे फार अवघड जात असल्याचे लिशालिनीने म्हटले. काही दिवसांपासून मी शांत होते, पण आता मी धैर्य एकवटून उघडपणे बोलत आहे, असेही तिने स्पष्ट केले.

खरे तर मी फार धार्मिक नव्हते आणि मला प्रार्थना कशी करायची हे देखील माहिती नव्हते. पण नुकतीच मी अध्यात्माकडे वळले असून काही आठवड्यांपासून नियमितपणे मंदिरात जात होते. हळूहळू सर्व गोष्टीही शिकत होते, असे लिशालिनी हिने सांगितले. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

आई हिंदुस्थानात गेल्याने 21 जूनला मी एकटीच मंदिरात गेली. तिथले पुजारी पुजेसंदर्भात मार्गदर्शन करायचे. पुजाऱ्याने सांगितले की, त्यांच्याजवळ पवित्र जल आणि रक्षा धागा आहे. तोच घेण्यासाठी त्यांनी मला मंदिरात बोलावले. शनिवारी मी मंदिरात गेले त्यावेळी गर्दी होती, त्यामुळे त्यांनी मला थांबण्यास सांगितले. मी जवळपास तासभर थांबले, असेही लिशालिनी हिने सांगितले.

त्यानंतर त्यांनी मला आपल्यामागे यायला सांगितले. मी त्यांच्यामागे ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांनी हिंदुस्थानातून तीर्थ आणल्याचे सांगितले. हे तीर्थ आपण कुणालाही देत नाही, असेही ते म्हणाले. त्यात काहीतरी टाकलेले होते आणि त्याचा तीव्र वासही येत होता. त्यांनी ते माझ्या चेहऱ्यावर शिंपडण्यास सुरुवात केली. यामुळे मला नीट दिसतही नव्हते. त्यानंतर त्यांनी मला माझा ड्रेस वर करायला सांगितला. मी नकार दिल्याने ते काहीतरी पुटपुटले आणि अचानक माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला. मी स्तब्ध झाले, मला काही सुचतही नव्हते, असेही लिशालिनी हिने सांगितले.

ती पुढे म्हणाली की, मी अनेकदा कामाच्या ठिकाणी, मिटिंगला, कार्यक्रमांना, पार्टीला एकट्याने जाते. पण तिथे कुणाची माझ्यावर हात टाकण्याची हिंमत झाली नाही. पण मी जिथे शांततेच्या शोधात गेले तिथे मंदिरात माझ्यासोबत असा प्रकरा घडला. मी जास्त खोलात जाऊन सांगणार नाही, पण एका पुजाऱ्याने माझा विनयभंग केला.

मी कसातरी तिथून पळ काढला तेव्हा तो म्हणाला, मी हे तुझ्यासाठीच केले असून हा आठवडा तुझ्यासाठी भाग्यवान ठरेल. त्या घटनेनंतर मला धक्काच बसला होता. माझी झोप उडाली, अनेक रात्री मी एकट्याने रडत जागून काढल्या. अखेर 4 जुलै रोजी मी याबाबत माझ्या आईला सांगितले. त्यानंतर तिने माझ्या वडिलांना आणि दोन भावांना सांगितले. त्याच दिवशी आम्ही पोलीस तक्रार दाखल केली, असेही लिशालिनी हिने सांगितले.