स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक – प्रभाग आरक्षणात धक्का बसलेल्या दिग्गजांचा मोर्चा शेजारच्या प्रभागावर

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची आरक्षण सोडत निघाल्यानंतर मागील निवडणुकीप्रमाणे आरक्षण पडल्याने काहींना दिलासा मिळाला तर अनेक दिग्गज आणि प्रस्थापितांचा हिरमोड झाला. निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या अनेक दिग्गजांनी शेजारच्या प्रभागात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेत ९५ जागा असून त्यापैकी २५ जागा ओबीसी प्रवर्गासाठी, ४ जागा अनुसूचित जातासाठी, १ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यात सर्वसाधारण वर्गातील महिलांसाठी ३३ जागा आरक्षित झाल्या आहेत. मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग निहाय काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये भाईंदर पूर्वेतील प्रभाग ३ मधील भाजपचे गणेश शेट्टी आणि प्रभाग ६ मधील भाजपचे ध्रुवकिशोर पाटील यांच्या जागा ओबीसी महिलेसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना सर्वसाधारण गटातून लढावे लागणार आहे. तर प्रभाग ११ मधील अनुसूचित जातीची जागा यंदा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाल्याने शिंदे गटाचे माजी नगरसेवक अनंत शिर्के यांचा पत्ता कट झाला आहे.

प्रभाग १२ मधील दोन जागा खुल्या वर्गातील महिलांसाठी तर १ जागा इतर मागास वर्गासाठी राखीव झाल्याने फक्त एकच जागा सर्वसाधारण गटासाठी आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपचे माजी उपमहापौर हसमुख गेहलोत आणि माजी सभापती अरविंद शेट्टी यांच्यापैकी एकाचे तिकीट कापले जाणार आहे.

रायगडात दहा नगर परिषदांसाठी २५ उमेदवारांचे अर्ज

रायगडात जिल्ह्यात दहा नगर परिषदांसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २५ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले असून एक अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाला आहे.

दहा नगर परिषदांच्या २१७नगरसेवकपदासाठी ही निवडणूक प्रक्रिया २पार पडणार आहे. त्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंत उरण नगर परिषदेत सर्वाधिक म्हणजेच १७ नामनिर्देशनपत्र व एक नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुरुड-जंजिरा येथे पाच आणि श्रीवर्धन व पेण येथे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे, तर खोपोली, अलिबाग, रोहा, महाड, कर्जत आणि माथेरान या नगर परिषदांमध्ये अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध पक्षांच्या आणि आघाड्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार

काशिमीरा भागातील प्रभाग १४ मध्ये भाजपच्या माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांना मात्र दिलासा मिळाला असून अनुसूचित जातीच्या महिलेसाठी १४ ‘अ’ आरक्षित झाला आहे. तसेच प्रभाग १४ मध्ये गेल्या वेळी महिलेसाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण होते. यावेळी ते अनुसूचित जमातीसाठी (पुरुष/महिला) असा आरक्षित केल्याने माजी भाजप नगरसेविका सुजाता पारधी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर याच प्रभागातील भाजपचे सचिन म्हात्रे यांची मागासवर्ग आरक्षणाची जागा महिलेसाठी राखीव झाल्याने म्हात्रे यांना तिकीट मिळणार की आणखी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहावे लागेल.

डहाणूत पथकांचा वॉच

डहाणू नगर परिषदेची निवडणूक सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. या अंतर्गत डहाणू शहरातील महत्त्वाच्या पाच ठिकाणी निगराणी पथके नेमण्यात आली असून त्यांचा वॉच राहणार आहे.

आगर मच्छीवाडा-बोर्डी रोड, कोस्टल महामार्ग-डहाणू खाडीपूल परिसर, कंक्राडी रोड, जव्हार रोड आणि डहाणू रेल्वे स्टेशन परिसरात ही निगराणी पथके तैनात करण्यात आली आहे. या पथकांकडून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

डहाणू नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत एकाही उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. पुढील काही दिवसात प्रमुख पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी निवडणूक आयोगाने १० ते १७नोव्हेंबर असा निश्चित केला आहे.