स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक – पालघर पालिका निवडणुकीसाठी ५६ केंद्रे, ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे नाव मतदार यादीतून गायब

पालघर नगर परिषदेमध्ये एकूण १५ प्रभाग असून ३० नगरसेवकपदासाठी ही निवडणूक होणार आहे. १५ प्रभागांमध्ये ११५ नगरसेवकपदासाठी ११५ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत ६ उमेदवार आहेत. १५ निवडणूक प्रभागांसाठी ५६ मतदान केंद्रे असणार आहेत. याअंतर्गत ७१ कंट्रोल युनिट, १४० बॅलेट युनिट आणि ७१ मेमरी यंत्र असणार आहेत.

२५ तारखेपर्यंत माघारीची मुदत आहे. यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. पालघर नगर परिषदेसाठी उपविभागीय अधिकारी शाम मदनूरकर हे निवडणूक निर्णय अधिकारी तर मुख्याधिकारी प्रशांत जाधव हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर तहसीलदार रमेश शेंडगे हे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत.

निवडणुकीत चुरस

उमेदवारी माघारीनंतर पालघर नगर परिषदेची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. विकासकामे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा तसेच स्थानिक प्रश्न या विषयांवर उमेदवार मतदारांना आकर्षित करत आहेत.

ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे नाव मतदार यादीतून गायब

आगामी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे समोर आले आहे. मुंब्यातील प्रभाग क्रमांक ३१ चे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तब्बल तीन टर्म असलेले माजी नगरसेवक सुधीर भगत यांचेच नाव मतदार यादीमधून वगळण्यात आले असल्याचे समोर आले आहे. निवडणूक विभागाच्या या कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत असून या याद्याच सदोष असल्याचा आरोप करण्यात येत आहे, तर दुसरीकडे नाव वगळण्यामागे राजकारण असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे. नाव समान असले तरी मतदार नोंदणी क्रमांक हा प्रत्येकाचा वेगळा असताना या गोष्टी का तपासल्या जात नाहीत? निवडणूक विभागाला नावे वगळण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न भगत यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले आहे.

रोह्यात महायुतीत ठिणगी, नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाच्या विरोधात शिंदे गटाची उमेदवारी

रोहा अष्टमी नगर पालिका निवडणुकीत महायुतीत ठिणगी पडली आहे. भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट स्वतंत्रपणे लढत आहेत. नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाच्या विरोधात शिंदे गटाने उमेदवारी दिल्यामुळे महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी ५१ उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी २ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने चार ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार गट सर्व १० प्रभागांत २० नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने चार ठिकाणी आणि शिंदे गट १३ जागा लढवत आहे. नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाच्या वनश्री शेडगे आणि शिंदे गटाच्या शिल्पा धोत्रे यांच्यात थेट लढत होत आहे.

राजेंद्र जैन बिनविरोध

रोहा अष्टमी नगर पालिकेत अजित पवार गटाने खाते उघडले असून प्रभाग क्रमांक २ मधून राजेंद्र जैन बिनविरोध निवडून आले आहेत.

२६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप

कर्जत कर्जत नगर परिषद निवडणुकीत ४७ उमेदवार रिंगणात आहेत. २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर या उमेदवारांचा प्रचार खऱ्या अर्थाने वेग घेणार आहे. नगराध्यक्षपदासाठी परिवर्तन विकास आघाडीकडून पुष्पा दगडे आणि महायुतीच्या डॉ. स्वाती लाड यांच्यामध्ये दुरंगी लढत होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वसई, विरारमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पालघर जिल्हा संपर्कप्रमुख बिलास पोतनीस, यंत्रणाप्रमुख अमोल कीर्तिकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

  • मुरुड-जंजिरा नगर परिषद निवडणुकीत २० नगरसेवकांसाठी ५९ उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आदेश डफल यांनी दिली.
  • गाडा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत, तर १७ प्रभागांमध्ये नगरसेवकपदासाठी ६७उमेदवार रिंगणात आहेत.
  • डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी ६५ उमेदवार रिंगणात आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी भाजपचे भरत राजपूत आणि शिंदे गटाचे राजू माच्छी यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.
  • बदलापूर नगर परिषदेसाठी २३० अर्ज दाखल झाले होते. २२ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे २४ जागांसाठी १४१ उमेदवार रिंगणात आहेत.