
सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षाचे खासदार अर्थसंकल्पावर प्रश्न उपस्थित करू सत्ताधारी पक्षाला भांबावून सोडत आहेत. अर्थसंकल्पावर संसदेत चर्चेची गुऱ्हाळे सुरू असताना काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव नोटीस दिली आणि सीमेवरील परिस्थिती तसेच चीनसोबतच्या व्यापारातील मोठ्या घाट्या संदर्भात चर्चेची मागणी केली. यावेळी एक आश्चर्याची गोष्ट घडली. नेहमी विरोधी पक्षावर ताव खावून असणारे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केंद्रीय मंत्र्यांनाच डोस पाजला.
संसदेतील प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना भाजपचे बंगळुरू ग्रामीण मतदारसंघाचे खासदार डॉ. सी.एन. मंजुनाथ एक प्रश्न उपस्थित करत होते. याच दरम्यान एका केंद्रीय मंत्र्यांनी संसदेमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा हावभाव पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा पार चढला. भर लोकसभेत बिर्ला यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मंत्रीजी हात खिशातून बाहेर काढा, असा आदेशच ओम बिर्ला यांनी दिला. यावेळी त्यांनी इतर सदस्यांनाही आवाहन केले की, कृपया हात खिशामध्ये घालून सभागृहात येऊ नका. यावेळी मंत्री महोदयांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांना रोखत ओम बिर्ला म्हणाले की, मंत्री महोदय आपण मध्येच का बोलत आहात? काय विचारायचे आहे जरा सांगा. हात खिशात घालण्यासंदर्भात आपण परवानगी द्याल का? आणि दुसरी विनंती अशी आहे की, जेव्हा एखादा माननीय सदस्य बोलत असेल तेव्हा कुणीही त्यांना क्रॉस करून पुढे येऊन बसू नये. त्यांच्या मागे जाऊन बसा, असे ओम बिर्ला म्हणाले. दरम्यान, ओम बिर्ला नक्की कोणत्या मंत्र्यावर भडकले हे कळालेले नाही.