BJP ला प्रभूश्रीराम पावले नाहीत! अयोध्येत असा झाला पराभव; विजयी उमेदवाराने सांगितलं कारण

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात 62 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 33 जागाच जिंकता आल्या. तर समाजवादी पक्षाने 36 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे ज्या अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली होती, त्याच अयोध्येत भाजपचा दारूण पराभव झाला. आता इथे विजयी होणाऱ्या जायंट किलरने म्हणजेच समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजपचा पराभव का झाला? याची कारणं सांगितली आहेत.

अयोध्या हे फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येतं. या मतदारसंघात भाजप उमेदवार लल्लू सिंह आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांच्यात प्रमुख लढत झाली. या लढतीत भाजप उमेदवार लल्लू सिंह यांचा 54 हजार 567 मतांनी पराभव झाला. अयोध्येतील हा पराभव पचवणं भाजपला खूप जड जाणार आहे. कारण अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा हा भाजपने प्रतिष्ठेचा केला होता. आणि राम मंदिराच्या अवती-भोवती देशात आणि खास करून यूपीमध्ये भाजपचे संपूर्ण राजकारण फिरले. यामुळे अयोध्येत भाजपचा पराभव झाल्याने सर्वच चकीत झाले आहेत. आणि आता या ठिकाणी विजयी होणाऱ्या समाजवादी पक्षाच्या उमेदवारानेच भाजपच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत.

अयोध्येत भाजपचा पराभव करणारे समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद हे जायंट किलर ठरले. अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या पराभवाची कारणं सांगितली. भाजपची जुमलेबाजी, वादग्रस्त विधानं, महागाई, बेरोजगारी आणि आरक्षण हे मुद्दे उचलून धरल्या कारणाने आपला विजय झाल्याचे अवधेश प्रसाद यांनी सांगितले.

याशिवाय अयोध्येचा बोजवारा उडवला आणि गरीबांच्या जमिनी कवडीमोल दरात खरेदी केल्या ही भाजपच्या पराभवाची मोठी आणि महत्त्वाची कारणे आहेत. एवढचं नव्हे तर शेतकऱ्यांची हालाकीची परिस्थितीही भाजपच्या पराभवाचे कारण ठारल्याचे अवधेश प्रसाद यांनी सांगितले.

दलित उमेदवाराचा विजय ऐतिहासिक

अयोध्या म्हणजेच फैजाबाद लोकसभा मतदारसंघाचा यावेळचा निकाल हा ऐतिहासिक मानला जात आहे. याचे कारण म्हणजे 1957 नंतर पहिल्यांदाच अनुसूचित जमातीशी संबंधित असलेले अवधेश प्रसाद हे लोकसभेवर निवडून गेले आहेत. या निवडणुकी भाजपने राम मंदिराच्या नावाने मते मागितली होती. तरीही फैजाबादमधील जनतेने भाजपला नाराकले.