लंडनहून मुंबईत परतातच डॉक्टर संग्राम पाटील यांना विमानतळावर पोलिसांनी घेतलं ताब्यात, सरोदेंनी व्यक्त केला संताप

लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानक त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोविड काळात महामारीशी लढण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून ते सातत्याने वैद्यकीय मार्गदर्शन करत होते. यातूनच ते चर्चेत आले होते. पोलिसांनी त्यांना नेमकं का ताब्यात घेतलं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र पोलिसांच्या या कारवाईवर आता ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी सांगतो व्यक्त केला आहे.

फेसबुकवर एक पोस्ट करत ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. असीम सरोदे म्हणाले आहेत की, “संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतले. आत्ताच त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे 2 वाजतापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्ताने ताब्यात ठेवलेले आहे.खरे तर हे अन्याकारक आहे आणि छळवाद आहे. संग्राम पाटील हे लंडनमध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत, त्यांच्यामध्ये डॉ. संग्राम पाटील यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी लंडनमध्ये माझे भाषण आयोजित केले होते.”

ते पुढे म्हणाले आहेत की, “पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडले जाईल, असे दिसते. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तशी पावले उचलण्यात येतील. पण पोलिसांनी अन्यायकारक कारवाई करू नये, कोणत्याही राजकीय व्यक्तीला पोलिसांनी स्वतःचा गैरवापर करू देऊ नये. आशा करूया की संग्राम पाटील यांना अटक करण्यात येणार नाही.”