
टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने आपल्या केबिन क्रू स्टाफसाठी कडक फिटनेस नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली 1 मेपासून लागू होईल. ज्या कर्मचाऱ्यांचे वजन जास्त असेल, त्यांना कामावरून हटवले जाऊ शकते किंवा त्यांचा पगारही कापला जाऊ शकतो. जे कर्मचारी फिटनेस चाचणीत नापास होतील किंवा ‘लठ्ठ’ श्रेणीत येतील, त्यांना पगार दिला जाणार नाही. वजन मर्यादेत आल्यानंतरच त्यांना पुन्हा कामावर घेतले जाईल.
टाटा समूहाने एअर इंडियाची सूत्रे हाती घेतल्यापासून कंपनीत अनेक मोठे बदल केले जात आहेत. कर्मचाऱयांमध्ये निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि जागतिक दर्जाचे फिटनेस मानक प्रस्थापित करणे हा नव्या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. हे नियम सध्या कार्यरत असलेल्या आणि प्रशिक्षण घेत असलेल्या अशा दोन्ही कर्मचाऱयांना लागू असतील. या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास कर्मचाऱयांना डय़ुटीवरून हटवले जाऊ शकते किंवा त्यांच्या पगारात कपात केली जाऊ शकते.























































