वसईत ईव्हीएमचा असाही झोल; कमळ, धनुष्यबाण ठळक इतर पक्षांची चिन्हे फिकट? शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने उठवला आवाज

ईव्हीएम मशीनवरून संपूर्ण देशात विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतानाच आता वसईतही यावरून वादाचा धुरळा उडाला आहे. वसई, विरारमधील ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची नावे,, चिन्हे दर्शवणाऱ्या पॅनलवर कमळ आणि धनुष्यबाण ही चिन्हे ठळकपणे दिसत आहेत. मात्र अन्य पक्षांची चिन्हे फिकट दिसत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. ईव्हीएमच्या या झोलझपाट्याविरोधात शिवसेना व बहुजन विकास आघाडीने आवाज उठवत निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

पालिकांचे मतदान १५ जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून ईव्हीएम मशीन त्या त्या मतदान केंद्रांवर रवाना केल्या जात आहेत. वसई-विरार पालिकेच्या मुख्य स्ट्राँग रूममधून ईव्हीएम मशीन आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्ट्राँग रूममध्ये हलवण्यात आल्या आहेत. याठिकाणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमची प्रात्यक्षिक दाखवून सिलिंग प्रक्रिया सुरू आहे. मात्र ईव्हीएम मशीनवर ‘कमळ’ व ‘धनुष्यबाण’ ठळकपणे दिसत असून अन्य पक्षांची चिन्हे पुसट असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे.

‘जर सर्व चिन्हांची छपाई एकाच मशीनमधून झाली असेल तर फक्त कमळ आणि धनुष्यबाणच ठळक कसे?’ शिवसेनेची मशालदेखील जाणीवपूर्वक माचिसच्या काडीसारखी दाखवली आहे. या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.
शशीभूषण शर्मा, वसई विधानसभा
संघटक, शिवसेना

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चुप्पी
शिवसेना व बविआने निवडणूक चिन्हांच्या गोल मालवरून उपस्थित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र या प्रकारावर निवडणूक प्रशासनाने अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया न देता चुप्पी साधली आहे. निवडणूक आयोगाच्या या कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.