
एलपीजी सिलिंडरच्या पुरवठा परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला असून त्यानुसार देशभरातील सिलिंडर बुकिंगमध्ये घट होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) दिलेल्या आकडेवारीनुसार 14 मार्च रोजी सुमारे 77 लाख एलपीजी बुकिंग नोंदवण्यात आली. त्याआधी 13 मार्च रोजी ही संख्या 88.8 लाख होती. म्हणजेच केवळ एका दिवसात बुकिंगमध्ये 11 लाखांहून अधिक घट झाल्याचे दिसून आले आहे.
सरकारच्या माहितीनुसार ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या एलपीजी बुकिंगचे प्रमाणही वाढले आहे. पूर्वी सुमारे 84 टक्के बुकिंग ऑनलाइन होत होते, तर आता हे प्रमाण सुमारे 87 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यावरून अधिकाधिक ग्राहक गॅस सिलिंडर रिफिलसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे सरकारने सांगितले.
दरम्यान, देशातील कोणत्याही एलपीजी वितरकांकडे सिलिंडर संपल्याची किंवा पुरवठा खंडित झाल्याची नोंद झालेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने दिलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार एलपीजी नियंत्रण आदेशात करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार ज्या ग्राहकांकडे आधीच पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) कनेक्शन आहे, त्यांनी आपले एलपीजी कनेक्शन परत करणे आवश्यक आहे.
























































