
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईतील स्ट्रीट फूड संस्कृतीवर मोठा परिणाम झाला आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात सहज मिळणारा वडापाव, समोसा, भजी यांसारखे रोजचे खाद्यपदार्थ आता कमी होताना दिसत आहेत. रिक्षाचालक, टॅक्सीचालक, मजूर आणि कामगार वर्गाची भूक भागवणारे हे पदार्थ अनेक ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
रस्त्यावरील स्टॉलधारकांना व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने काहीजण घरगुती सिलिंडर काळ्या बाजारातून 1300 ते 1800 रुपयांना विकत घेत आहेत. मात्र कारवाईची भीती असल्याने हे सिलिंडर गोणपाटाखाली लपवून ठेवले जात असल्याचे समोर आले आहे.
लालबागमधील प्रसिद्ध ‘लाडू सम्राट’ येथील वडापावच्या विक्रीवरही याचा परिणाम झाला आहे. दुकानाचे मालक कमलाकर राक्षे म्हणाले, “काल सिलिंडर मिळाला नाही म्हणून दुकान बंद ठेवावे लागले. आज चार सिलिंडर मिळाले म्हणून दुकान सुरू आहे. उद्या काय होईल सांगता येत नाही.”
जुहूमधील ‘गुलाटीज’ या दुकानातही परिस्थिती गंभीर आहे. दुकानाचे मालक विक्की गुलाटी म्हणाले, “आम्हाला दररोज तीन ते चार सिलिंडर लागतात, पण एकही सिलिंडर मिळालेला नाही. आज काही पदार्थ उपलब्ध आहेत, पण आम्ही समोसासाठी उद्याच्या ऑर्डर घेणे बंद केले आहे. माझी सर्वात मोठी चिंता म्हणजे 100 कामगारांना काम कसे द्यायचे. जर तुटवडा सुरूच राहिला तर ते काम सोडून जातील.”
विलेपार्ले येथील प्रसिद्ध ‘सम्राट’ या हॉटेलनेही आपला मेनू कमी केला आहे. प्रवक्ते हसमुख कुमार म्हणाले, “सध्या आम्ही काही प्रमाणात इलेक्ट्रिक उपकरणे आणि डिझेलच्या मदतीने काम चालवत आहोत. मात्र काही पदार्थ गॅसशिवाय बनवणे शक्य नाही. इंडक्शनवर काम जलद होते, पण गॅसवर जशी आच नियंत्रित करता येते तशी सुविधा नसते. एलपीजीचा तुटवडा आणखी एक-दोन आठवडे राहिला तर अडचणी वाढू शकतात.”
गॅस संकट उघड होताच सर्वप्रथम डोसा आणि तव्यावर बनणारे पदार्थ मेनूमधून काढावे लागले, कारण या पदार्थांसाठी सतत जास्त आचेची गरज असते. याशिवाय मोमो, सँडविच, दाबेली आणि चाटसारखे पदार्थही बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण त्यासाठी उकडलेले बटाटे आणि बीट तयार करण्यासाठी गॅस लागतो.
दरम्यान, काही मोठ्या ब्रँड्सवर या संकटाचा फारसा परिणाम झालेला नाही. फोर्टमधील ‘आराम’ आणि शहरभरातील ‘जंबो किंग’ या ठिकाणी प्रामुख्याने इलेक्ट्रिक उपकरणे आणि इंडक्शनचा वापर होत असल्याने त्यांचे कामकाज सुरू आहे. मलाडमधील जंबो किंग फ्रँचायझीचे राजेश यादव म्हणाले, “आम्ही आठ-नऊ वर्षांपासून इलेक्ट्रिक उपकरणांवर काम करत आहोत.” फ्रँचायझी मॅनेजर सिद्धार्थ आदे यांनी सांगितले की, “आमच्याकडे गोठवलेले वडा असतात, ते फक्त तळून सर्व्ह करायचे असतात, त्यामुळे इंडक्शनवरही काम व्यवस्थित चालते.”
एलपीजीचा तुटवडा कायम राहिल्यास मुंबईच्या स्ट्रीट फूड व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.























































