
इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हिंदुस्थानमध्ये एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि अनेक उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. यादरम्यान आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढल्याची टीका केजरीवाल यांनी केली. ते दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
सध्या देश अत्यंत गंभीर संकटातून जात आहे. संपूर्ण देशात एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. कारण देशात दैनंदिन उत्पादनाच्या केवळ 50 टक्केच उत्पादन होत आहे. आपल्या देशात एलपीजीच्या एकूण वापरापैकी 60 टक्के आपण आयात करतो. त्या 60 टक्क्यांपैकी 90 टक्के वाटा हॉमुर्झच्या सामुद्रधुनीमधून येतो. हा मार्ग हिंदुस्थानसाठी बंद झाला आहे. आता देशात केवळ 50-55 टक्केच एलपीजी उपलब्ध होत आहे, असे केजरीवाल म्हणाले.
Press conference on the severe LPG shortage affecting people across the country | LIVE https://t.co/bnfElT2JE8
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 11, 2026
एलपीजीच्या टंचाईचा सर्वात मोठा फटका रेस्टॉरंट आणि हॉटेल्सना बसत आहे. सरकारने आदेश जारी केला आहे की, रेस्टॉरंट आणि हॉटेल्सना एलपीजी गॅस पुरवला जाणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव रेस्टॉरंट आणि हॉटेल्स या सिलेंडर्सचा साठा करू शकत नाहीत. त्यांना दररोज सिलेंडर पुरवले जातात. आता अचानक एलपीजी पुरवठा बंद झाल्यामुळे त्यांच्याकडे दोन दिवसांचाही साठा नाही. मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद झाली आहेत. पुढील तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची भीती आहे. तामिळनाडूमध्ये 10 हजार हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पंजाब-दिल्लीतही हजारो हॉटेल्स बंद होणार आहेत. सध्या लग्नाचा हंगाम आहे. जर हे असेच सुरू राहिले, तर अनेकांना लग्नाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागतील. अशाच बातम्या बेंगळुरू, हैदराबाद, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, हरियाणा, बिहार अशा सर्व ठिकाणांहून येत आहेत.
गुजरातच्या ‘टाईल्स इंडस्ट्रीचे कॅपिटल’ असलेल्या मोरबीमध्ये 650 उद्योगांपैकी 170 बंद झाले आहेत आणि 1 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. संपूर्ण देशात 1 कोटीहून अधिक लोक अचानक बेरोजगार होण्याची भीती आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाल्यावर काय परिस्थिती ओढवेल, याची आपण कल्पना करू शकतो, असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांत सरकारने घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर खूप वाढवले आहेत. सरकारने वाढवलेले दर तर वेगळेच आहेत, पण आता बाजारपेठेत सिलेंडरचा मोठा काळाबाजार सुरू आहे. हे का घडत आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला. जगातील बहुतेक तेल आणि गॅसची वाहतूक ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’मधून होते. इराणने या मार्गावर ताबा मिळवला असून, जे देश त्यांचे मित्र आहेत त्यांनाच त्यांची जहाजे नेण्याची परवानगी असेल असे म्हटले आहे. म्हणूनच फक्त रशिया आणि चीनची जहाजे तिथून जात आहेत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी चूक केली आहे. कोणत्याही युद्धात आपण कोणाचीही बाजू घ्यायला नको होती. आपण तटस्थ राहायला हवे होते. हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण गेल्या 75 वर्षांपासून चालत आले होते, जे पंतप्रधान मोदींनी काही दिवसांतच उद्ध्वस्त केले. ते थेट इस्रायल-अमेरिकेच्या बाजूने आणि इराणच्या विरोधात उभे राहिले. युद्ध सुरू होण्याच्या एक दिवस आधी त्यांना इस्रायलला जाण्याची काय गरज होती? असा सवालही केजरीवाल यांनी केला. यावेळी केजरीवाल यांनी मोदींनी ट्रम्पचा गुलाम असेही म्हटले.

























































