
बोलीभाषा महाराष्ट्राचे वैभव आहे, त्या समृद्ध झाल्याशिवाय मराठी समृद्ध होणार नाही. त्यामुळे ‘बोलीं’ना विसरू नका, त्या जपा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्पृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी केले.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होत आहे. त्याचा शुभारंभ आज महाकवी कालिदास कलामंदिरात चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके रंगमंचावर बोलींच्या महोत्सवाने झाला. या उद्घाटनप्रसंगी मधु मंगेश कर्णिक यांनी बोलीभाषांचे महत्त्व सांगितले. कोकण, खान्देशासह राज्यात बोलींची संख्या मोठी आहे, हजारो वर्षांपासून त्या मराठी भाषेत मुरलेल्या आहेत. म्हणून मराठी समृद्ध आहे. त्यांचे महत्त्व विसरता कामा नये, असे सांगताना त्यांनी ज्ञानेश्वरीत आलेल्या बोलीभाषेतील शब्दांचे दाखले दिले.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राज्य साहित्य व संस्पृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, श्रीपाद जोशी, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण पुलकर्णी, मविप्र सरचिटणीस, स्वागताध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, मराठी भाषा विकास विभागाचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे उपस्थित होते.
आज उद्घाटन सोहळा
मराठी भाषा गौरव दिनी उद्या 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता कविश्रेष्ठ पुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून केटीएचएम महाविद्यालयातील पुसुमाग्रज नगरीपर्यंत शोभायात्रा काढण्यात येईल. येथेच दुपारी 3 वाजता मुख्य उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे, मधू मंगेश कर्णिक, श्रीनिवास पुलकर्णी, डॉ. दिलीप धोंडगे आदी पुरस्कारार्थींचे चर्चासत्र होईल.





























































