
लग्न जुळवताना मुलीच्या कुटुंबीयांना एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे असे तरुणाने सांगितले, परंतु या तरुणाचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले नसून तो आठवी नापास आहे, असा गंभीर आरोप पत्नीने केला आहे. या प्रकरणी मुलीने मुलाच्या कुटुंबाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील धार जिह्यात उघडकीस आली आहे. काम्या सिंह असे या तरुणीचे नाव असून तिने सासरच्या मंडळींविरोधात हुंडय़ासाठी छळ केला जात असल्याचा आरोपसुद्धा केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पुक्षी विधानसभेचे आमदार सुरेंद्र सिंह बघेल, त्यांची पत्नी शिल्पा सिंह बघेल, सासू चंद्रपुमारी सिंह, शीतल सिंह आणि नवरा देवेंद्र सिंह बघेल यांचा समावेश आहे. हुंडय़ामध्ये लक्झरी कार न दिल्याने आपल्याला मारहाण करण्यात आली. लग्नाआधी नवरा मुलगा एमबीए पास आहे असे सांगितले, परंतु लग्नानंतर तो आठवी नापास आहे, हे उघड झाल्याचेही काम्याने म्हटले आहे.