पाकिस्तानला ड्रोन पुरविणाऱ्या कंपनीला भोपाळ-इंदूर मेट्रोचे काम,मध्य प्रदेशातील भाजप सरकारचा कारनामा उघड

तुर्की कंपनीच्या ड्रोनचा वापर करून पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ले केले त्याच आसिस नावाच्या कंपनीला मध्य प्रदेशमधील भाजप सरकारने भोपाळ आणि इंदूर मेट्रोच्या डिजिटल तिकीटिंगचे कंत्राट दिले आहे. याच कंपनीची पॅरेंट कंपनी आसिस गार्डने पाकिस्तानला ड्रोन्स पुरवले होते. दरम्यान, ही बाब उघड झाल्याने भाजपची गोची झाली असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देत सरकारने सारवासारव केली.

तुर्कीच्या आसिस कंपनीला इंदूर, भोपाळ आणि आग्य्रातील मेट्रोमध्ये डिजिटल यंत्रणा बसवण्याचे काम देण्यात आले आहे. याच कंपनीची पॅरेंट कंपनी आसिस गार्ड शस्त्र बनवण्याचे आणि त्याचा पुरवठा करण्याचे काम करते. याच कंपनीने पाकिस्तानला सोनार ड्रोनचा पुरवठा केला होता. याच ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानने 8आणि 9 मे रोजी हिंदुस्थानी लष्कराचे तळ आणि नागरी वस्त्यांवर हल्ले केले होते.

मेट्रो कार्डपासून डिजिटल तिकीटिंगपर्यंतचे कंत्राट

आसिस कंपनी मेट्रो कार्डपासून डिजिटल तिकीटिंग देण्यापर्यंतचे काम करणारी यंत्रणा मेट्रोमध्ये बसवणार आहे. याच कंपनीकडे मेट्रोच्या दरवाजांचेही नियंत्रण असणार आहे. याशिवाय नागरिक डेटा, प्रवास पॅटर्न, सर्व प्रकारचे तांत्रिक नियंत्रण शत्रुराष्ट्राला शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे असणार आहे. त्यामुळे भविष्यात घातपात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी जोर धरू शकते.
तुकाa कंपनीने बसवलेली तीच यंत्रणा दिल्ली मेट्रोसह अनेक ठिकाणी स्वदेशी कंपन्यांनीही बसवली आहे. असे असताना स्वदेशी कंपन्या सोडून परदेशी कंपनीला मेट्रोचे कंत्राट का, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

आता चौकशीचे आदेश
याप्रकरणी विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जर ही तीच कंपनी असेल तर कंत्राट तत्काळ रद्द करण्यात येईल, असे विजयवर्गीय म्हणाले.

मेट्रोला मोदी दाखवणार हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 मे रोजी व्हर्च्युअल माध्यमातून इंदूर मेट्रोच्या कर्मशियल रनसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे, तर भोपाळ मेट्रोचे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. अशा स्थितीत तुकाa कंपनीला या मेट्रोच्या कामाचे कंत्राट देण्याचे समोर आल्यामुळे मोदी सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. परिणामी, मोदींचा उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला जाऊ शकतो.