माघ महिन्यातील ‘महोत्कट’ उत्सव

162

प्रासंगिक    <<  ज्योत्स्ना गाडगीळ >>

गणेशोत्सव वर्षभरातून दोनदा साजरा केला जातो, एक भाद्रपदात आणि दुसरा माघात! भक्तांवरील संकट निवारण करण्यासाठी माघ शुद्ध चतुर्थीला बाप्पाने भरदुपारी अदिती आणि कश्यप ऋषींच्या उदरी ‘महोत्कट’ नावे जन्म घेतला आणि भक्तांच्या आग्रहास्तव तो पाहुणचार घेण्यासाठी भाद्रपदात भक्ताघरी येऊ लागला. असा हा माघ महिन्यातील गणेशोत्सव! गणरायांच्या अवताराच्या अनेक जन्मकथा सांगितल्या जातात. त्यापैकी प्रचलित कथा म्हणजे महोत्कटाची!

पुराणकाळात अंगदेशात रुद्रकेतू नावाचा ब्राह्मण राहत होता. तो आणि त्याची पत्नी शारदा यांना जुळी मुले झाली. एकाचे नाव ठेवले देवांतक आणि दुसऱयाचे ठेवले नरांतक! मुले मोठी झाल्यावर त्यांची मुंज करण्यात आली. ही मुले भविष्यात पराक्रमी होतील असे भविष्य महर्षी नारदांनी वर्तवले आणि त्या दोघांना महादेवाला तपश्चर्येने प्रसन्न करून घेण्यास सांगितले. मुलांनी तपश्चर्या केली आणि भोळ्या महादेवाला प्रसन्न करून घेतले. देव भेटल्यावर काय मागावे हेही कळले पाहिजे! त्या दोघांनी विकृत वृत्तीने हे जग जिंकून घेण्याचा वर मागितला. तसेच दिवस-रात्री, पशु-मानव यांच्याकडून आमचा वध होऊ नये असेही वरदान मागितले. मुलांच्या वाढत्या मागण्या पाहून महादेव ‘तथास्तु’ म्हणून अंतर्धान पावले!

आपल्याला कोणी हरवू शकणार नाही, जगावर आपल्याला राज्य करता येईल या विचाराने दोघेही उन्मत्त झाले. चांगली माणसे शोधावी लागतात, पण विकृत माणसे सहज सापडतात. या दोघांनाही तशीच फौज मिळाली. त्या सर्व सैन्याला घेऊन त्यांनी स्वर्ग, भूमी आणि पाताळ लोकावर धाड घातली, तिथल्या लोकांना पदभ्रष्ट करून आपली माणसे नेमली, स्त्रियांचा अनन्वित छळ केला, लहान मुले मारून टाकली, देवांनाही गुलाम केले. अशी सर्व भयंकर स्थिती पाहून देवमाता अदिती कश्यप ऋषींना म्हणाली, या दुष्टांचा संहार करण्यासाठी आदिरूप ओंकाराने माझ्या उदरी जन्म घ्यावा असे मला वाटते. कश्यप ऋषी म्हणाले, त्यासाठी तुला घोर तपस्या करून गणरायाला प्रसन्न करावे लागेल. जगताच्या उद्धारासाठी तिनेही तयारी दाखवली. दूर अरण्यात जाऊन तपश्चर्या केली आणि गणेशाला प्रसन्न करून घेतले. ‘‘जगाच्या रक्षणासाठी तूच माझ्या पोटी जन्माला ये’’ असा वर मागितला. बाप्पाने ‘तथास्तु’ म्हटले आणि कालांतराने कश्यपगृही जन्म घेतला. असुरांचा नाश करण्याच्या उत्कट हेतूने जन्म घेतला म्हणून या महागणपतीचे नाव महोत्कट ठेवण्यात आले. देवांतक आणि नरांतकाची अट अबाधित ठेवण्यासाठी गणरायाने गजमुख धारण केलेल्या मानवदेहात जन्म घेतला आणि दिवसरात्रीची वेळ वगळता दुपारची वेळ निवडून दैत्यांचा वध केला. त्या दिवसाची आठवण म्हणून माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. आजही समाजात असुर माजले आहेत, त्यांचा नायनाट करण्यासाठी गणरायाने दिलेल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा वापर करून आपल्यातल्या महोत्कटाला जागृत करूया. हीच या उत्सवाची फलश्रुती असेल.

 

             

आपली प्रतिक्रिया द्या