70 टक्के जनतेला रत्नागिरीतील 20 वर्षांचा वनवास संपवायचा आहे – बाळ माने

मी काही दिवसांपूर्वी जनतेचा कौल मागितला होता. 70 टक्के जनतेने माझ्या बाजूने कौल देताना गेल्या 20 वर्षांतील हा वनवास संपवायचा आहे, असे मला सांगितले. आज आई जगदंबेने उध्दव ठाकरे यांच्या हातात जी मशाल दिली आहे. त्या मशालीच्या ज्वाळेत विरोधकांना जाळायचे आहे, असे आवाहन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी केले आणि वाजत-गाजत आपला उमेदवारी अर्ज भरला.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, आपले मशाल चिन्ह जनतेपर्यंत पोहचले आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 84 हजार मते मिळाली आहे. 84 हजार मतदारांनी मशाल चिन्हा समोरचं बटण दाबले होते. आता विधानसभा निवडणुकीत दीड लाख मतदारांनी मशाल चिन्हा समोरचं बटण दाबायचे आहे. 23 नोव्हेंबर रोजी आपल्याला विजयाचा गुलाल उधळायचा आहे, असे आवाहन माने यांनी केले. त्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदयात्रेत वाजत-गाजत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रांत कार्यालयात गेले. बसस्थानकाजवळ पदयात्रा आल्यानंतर बाळ माने रिक्षाचालकांच्या आग्रहाखातर रिक्षात बसले आणि अर्ज भरण्यासाठी प्रांतकार्यालयात गेले.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आठवडा बाजार येथे महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, शिवसेनेत येण्यापूर्वी उदय सामंत यांना निवडणुकीत जेमतेम सहा हजारांचे मताधिक्य मिळत होते. शिवसेनेत आल्यावर 40 हजारावर मताधिक्य गेले. शिवसेनेत म्हाडा, त्यानंतर मंत्रीपद मिळवून भरपूर माया त्यांनी गोळा केली आणि शिवसेनेच्याच पाठीत खंजीर खुपसला. आता पुन्हा एकदा सामंताना धडा शिकवा. ही सामंत संस्कृती मातीत गाडून टाका, असे आवाहन राजन साळवी यांनी केले. ते पुढे म्हणाले की, राजापूरात पैशांच्या जोरावर उदय सामंताचे बंधू आमदार होण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्या किरण सामंत आणि उदय सामंत या दोघांनाही पाडणार आणि मी विजयाचा चौकार मारणार, असे राजन साळवी यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, समन्वयक संजय पुनसकर, जिल्हा महिला संघटक वेदा फडके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव बशीर मुतर्झा, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष नीलेश भोसले, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हारिस शेकासन, शहराध्यक्ष रमेश शहा, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, भामशक्तीचे अनिरूध्द कांबळे, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, माधवी माने व इतर मान्यवर उपस्थित होते.