
सातारा जिह्यातील थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय पातळीवर याचा मोठा गाजावाजा करण्यात येत आहे. मात्र, पर्यटन विकासाच्या नावाखाली महाबळेश्वर नगरपालिकेत सुरू असलेल्या विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. पर्यटन विकासाच्या 100 कोटींतून अपेक्षित कामे न करता ते शहरातील रस्ते आणि गटार दुरुस्तीवर खर्ची घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केल्यावर साधी चौकशीही सुरू करण्यात आलेली नाही.
महाबळेश्वर गिरिस्थान पर्यटन स्थळी दरवर्षी पर्यटनासाठी येणाऱया लाखो पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून पर्यटन विकासासाठी 100 कोटींचा निधी देण्यात आला. या निधीतून लेझर शो तसेच विविध अत्याधुनिक मनोरंजनात्मक व आकर्षक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. तसेच आरक्षित जागेवर वाहनतळ निर्माण करणे, बागबगिचे यांची सुधारणा करून जास्तीत जास्त पर्यटकांना महाबळेश्वर पर्यटन स्थळाकडे आकर्षित करणे अपेक्षित होते. मात्र, नगरपालिकेने शहरातील सिमेंट काँक्रीटची गटारे व रस्ते तसेच भल्या मोठय़ा भिंतीच्या बांधकामावर पर्यटन विकासाचा निधी खर्ची घालून कोटय़वधी रुपयांचा अपव्यय केला या प्रकरणी दोषींवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सूर्यकांत पांचाळ यांनी मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांकडे पत्र पाठवून केली आहे.
सांस्कृतिक भवन धूळखात
कोटय़वधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे. मात्र, त्याची योग्य पद्धतीने देखभाल ठेवली नसल्याने सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाची दुरवस्था होऊन कोटय़वधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे.
– नगरपालिका आणि राज्य सरकारच्या विकासनिधीतून मागील तीन-चार वर्षांत कोटय़वधी रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र या निधीतून अपेक्षित कामेच झालेली नाहीत. जी कामे करण्यात आली त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
– पर्यटन विकास निधीतून नगरपालिका हद्दीत दोन ते तीन वर्षे विकासकाम सुरू असताना पर्यावरणास अनुकूल असणारी जांभ्या दगडाची गटारे काढून केलेले सिमेंट काँक्रीटचे गटाराचे बांधकाम अयोग्य व चुकीचे असल्याचे दिसून येत आहे.