
कोल्हापूर जिह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानच्या माधुरी उर्फ महादेवी या हत्तिणीला परत आणण्यासाठी आज गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील समस्त जैन समाज व सर्वधर्मियांनी गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयावर आत्मक्लेश महामोर्चा काढत याकडे शासनाचे लक्ष वेधले.
मुनिश्री 108 विदेहसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बेलबाग येथील जडेयसिद्धेश्वर आश्रमाचे व हत्तरगी कारीमठ येथील स्वामीजींची उपस्थिती होती. पिराजी पेठेतील जैन मंदिरापासून आत्मक्लेश महामोर्चाचा प्रारंभ झाला. वीरशैव चौकातून बाजारपेठमार्गे हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्यात आले.
विदेहसागरजी महाराज म्हणाले, नांदणी येथील मठाला हजारो वर्षांची तर अशा मठांमध्ये हत्तींची परंपरा सातशे वर्षांची आहे. आजपर्यंत ही परंपरा कधीच खंडित झाली नाही. मात्र, पेटा व वनताराने ही परंपरा खंडित करण्याचे काम केले आहे. पेटा या संस्थेने नांदणी मठातील हत्तिणीकडून भीक मागून घेतली जाते, असे म्हणणे याचिकेत मांडले आहे. मात्र, हा विधी भीक मागण्याचा नव्हे, तर ‘माधुरी’ला दररोज सकाळी वनविहार करण्याचा होता, हा देखभालीचाच एक भाग असतो. राज्यभरात सुरू असलेल्या जनभावनेची कदर करून वनताराने स्वतःहून न्यायालयात याचिका दाखल करावी व आम्ही माधुरी हत्तिणीला द्यायला तयार आहोत, असे सांगून स्वातंत्र्यदिनापूर्वी हा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नाहीतर जनआंदोलनाचे हे लोण आता प्रत्येक गावागावांत पोहोचेल, असे ते म्हणाले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जनता दलाच्या स्वाती कोरी, ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गडय़ानावर, मनसेचे नागेश चौगुले, काँग्रेसचे दिग्विजय कुराडे, राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, सिद्धार्थ बन्ने, उदय जोशी, सतीश पाटील, संग्राम सावंत, रफिक पटेल यांनी ‘वनतारा’वर रोष व्यक्त निषेध केला.