
महाराष्ट्रात विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या (एसआयआर) सर्वेक्षणाच्या नावाखाली तब्बल 2 कोटी 90 लाख मतदार कमी होणार आहेत. जर इतक्या मोठय़ा प्रमाणावर मतदारांची नावे वगळली गेली तर त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांच्या निकालांवर होऊ शकतो, अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज व्यक्त केली आहे.
भारत निवडणूक आयोगाने मतदारयादी विशेष पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी आज एक्स या समाज माध्यमातून एसआयआरबद्दल शंका व्यक्त केली आहे. विशेष पुनरीक्षण ही प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी, दुबार नावे काढण्यासाठी किंवा मृत मतदारांची नावे वगळण्यासाठी राबवली जाते. मात्र, विरोधी पक्षांकडून वारंवार असा आरोप केला जात आहे की, या प्रक्रियेचा वापर करून विशिष्ट विचारसरणीच्या किंवा समुदायांच्या मतदारांची नावे यादीतून जाणीवपूर्वक कमी केली जात आहेत, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.




























































