
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या, ही तुमच्याच सरकारची त्यावेळी मागणी होती. त्यासाठी पाच महिने संप चालला. आता ट्रिपल इंजिन सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत समाविष्ट करणार का, असा सवाल शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी विचारला.
एसटी महामंडळातील विविध रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत आमदार श्रीकांत भारतीय यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी नवीन बसेस खरेदी करण्यात येत असून दरवर्षी पाच हजार नवीन बस खरेदी करण्यात येणार आहेत. नवीन बस खरेदीबरोबरच महामंडळामध्ये रिक्त असणाऱ्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत पूर्वी महामंडळामध्ये काम केलेल्या कंत्राटी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
एसटीची चाके खिळखिळी करण्याचे काम पडळकर आणि खोत जोडीने केले आहे. त्यावेळेला ते एसटीच्या संपाला प्रोत्साहन देत होते, त्यामुळे कंत्राटी कर्मचारी भरती करावी लागली. हे कंत्राटी कर्मचारी आजही काम करतायत. त्यांना कायम करण्याबाबत निर्णय घ्या, अशी मागणी परब यांनी केली.

























































