
राज्यात अमली पदार्थांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत 14 प्रकरणांमध्ये मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिह्यातील सावरी व पचुपतेवाडी येथे अमली पदार्थ निर्मितीचे कारखाने सुरू असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यात अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून या प्रकरणात पूर्णपणे ‘झीरो टॉलरन्स’ची असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले. अमली पदार्थाच्या पुरवठा साखळीवरही कठोर कारवाई केली जात असून कच्चा माल पुरवठा करणाऱ्यांवरही मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे, असेही कदम यांनी सांगितले. या प्रश्नाच्या चर्चेत शिवसेना आमदार अॅड. अनिल परब, सतेज पाटील, अनिल परब, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला. तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे, असे अनिल परब म्हणाले. या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन धडक कारवाई करा, असे ते म्हणाले. राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, अमली पदार्थाच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने अँटी-नार्कोटिक टास्क फोर्स स्थापन केला आहे. या टास्क फोर्सचे मुख्य काम अमली पदार्थ विरोधात कारवाई करणे आणि त्यामागील संपूर्ण साखळी शोधून काढणे हे राहणार आहे.
साताऱ्यातील जावळी प्रकरणात 11 आरोपी अटकेत
सातारा जिह्यातील जावळी तालुक्यात उघडकीस आलेल्या अमली पदार्थ प्रकरणात काही ठिकाणी बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये किंवा ग्रामीण भागातील शेडमध्ये लपूनछपून अमली पदार्थ तयार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणात 11 आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात कठोर कारवाई सुरू आहे.

























































