
स्वयंपाकाच्या गॅसच्या प्रचंड तुटवड्यावरून आज विरोधी पक्ष विधिमंडळात आक्रमक झाला. सभागृहाच्या बाहेर आंदोलन करतानाच विरोधकांनी सभागृहातही सरकारला धारेवर धरले. गॅस तुटवड्यामुळे राज्यात भयावह परिस्थिती असून चूल पेटवायची कशी अशी चिंता लाडक्या बहिणींना पडली आहे. राज्यातील 30 टक्के हॉटेल्स बंद पडली आहेत. मंत्रालयातील कॅण्टीनची चूल विझली आहे. सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे, असे सांगतानाच, विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने आता जनतेने चूल पेटवायची कशी याचे उत्तर द्यावे, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारला जाब विचारला.
राज्यातील सद्यस्थिती मांडताना वडेट्टीवार म्हणाले की, मंगळवारी विधानसभेचे कामकाज मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू असताना कॅण्टीन बंद होते. बाहेरील हॉटेल्स गॅसअभावी बंद आहेत. त्यामुळे अनेक सदस्यांना जेवणही मिळाले नाही, अशी माहिती वडेट्टीवार यांनी सभागृहाला दिली.
गॅसचा इतका तुटवडा निर्माण झाला आहे की, सिलिंडरची गाडी चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हे अत्यंत भयावह आहे. कोल्हापूर आणि विदर्भासह राज्यभरात गॅसटंचाईच्या निषेधार्थ आंदोलने सुरू झाली आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
गॅस पुरवठ्याचा विषय केंद्राच्या अखत्यारित असल्यामुळे राज्य सरकारने सद्यस्थितीबाबत जनतेला जागरूक केले पाहिजे. युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक कारणांमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला असेल तर किती साठा उपलब्ध आहे आणि सरकार काय उपाययोजना करणार, याबद्दल सरकारने सभागृहात निवेदन केले पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर हा विषय केंद्राशी निगडित असला तरी राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी सर्व उचित उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.





























































