
मुंबईत सध्या खासगी विकासकांकडून मोठ्या प्रमाणात पुनर्विकास सुरू असून इमारती बांधण्याचा सपाटा सुरू आहे. पुनर्विकास करताना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात या रहिवाशांना भाड्याने जागा दिली जाते. मुंबईतील 14 खासगी विकासकांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील शेकडो गाळे भाडेतत्त्वावर घेतले असून गेल्या आठ वर्षांत सुमारे 292 कोटी 38 लाखांची थकबाकी ठेवली आहे. या विकासकांनी 15 दिवसांच्या आत पैसे भरले नाहीत तर त्यांनी भाड्याने घेतलेले गाळे सील केले जातील, असा इशारा राज्य सरकारच्या वतीने गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला.
मुंबईत जागांचे भाव गगनाला भिडले असून बांधकाम व्यवसाय हा कमी कालावधीत कोट्यवधींचा नफा देणारा व्यवसाय झाला आहे. जुन्या चाळी, झोपडपट्ट्या, इमारती यांच्या पुनर्विकासाचा वेग वाढला आहे, मात्र पुनर्विकास करताना विकासकांकडून रहिवाशांसाठी म्हाडाची संक्रमण शिबिरे भाड्याने घेतली जातात, मात्र या गाळ्यांचे भाडे विकासक वर्षानुवर्षे भरत नसल्यामुळे त्यांची थकबाकी कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. यावर विधान परिषदेत आज भाजप सदस्य निरंजन डावखरे यांनी प्रश्न विचारला त्यावर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिले.
सहा विकासकांना बांधकाम थांबवण्याची नोटीस
म्हाडाने 1 एप्रिल 2016 ते जानेवारी 2025 पर्यंत या आठ वर्षांत 274 कोटी 38 लाखांची वसुली केली, मात्र असे असूनही जानेवारी 2025 पर्यंत थकबाकीची रक्कम 172 कोटी 54 लाख आणि त्यावरील विलंब दंड 119 कोटी 84 लाख असे मिळून 292 कोटी 38 लाख थकबाकी शिल्लक आहे. थकबाकी ठेवणाऱ्या 14 पैकी 6 विकासकांवर कारवाई करत त्यांना बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर 12 विकासकांना थकबाकी भरत नाहीत तोपर्यंत इतर परवानग्या देऊ नये, असे निर्देश म्हाडा आणि एसआरएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती भोयर यांनी दिली.
ठाण्यातील हायलँड स्प्रिंगच्या विकासकाची सखोल चौकशी होणार
ठाण्याच्या विकासकाने म्हाडाबरोबर मिळून 20 टक्क्यांनी परवडणारी घरे उपलब्ध करून दिली, मात्र सुरुवातीला हायलँड स्प्रिंग असे प्रकल्पाचे नाव जाहीर करून नंतर प्रकल्पाचे नाव बदलून हायलँड पर्ल करण्यात आले. प्रकल्पाला ओसी आणि लॉटरी विजेत्यांकडून एक टक्क्याची रक्कमही हायलँड स्प्रिंगच्या नावाने आहे. विकासकाने अधिकचा फायदा मिळवण्यासाठी हे केले आहे. त्यामुळे सरकारने कारवाई करावी, अशी मागणी डावखरे यांनी केली. दरम्यान, पंकज भोयर यांनी विकासकाविरोधात रीतसर तक्रार दाखल करून सखोल चौकशी करण्यात येईल असे सांगितले.
पोलीस ठाण्यात तक्रार; बँक खात्याचा तपशील घेणार
आतापर्यंत 22 विकासकांपैकी 6 विकासकांवर वांद्रे येथील खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हाडा अधिनियम 1976 च्या कलम 180 नुसार कारवाई करण्यात येत आहे. विकासकांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तांचा तपशील मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्याच्या सूचना करण्यात आली आहे. बँक खात्यांचा तपशील घेतला जात आहे, अशी माहिती भोयर यांनी दिली.





























































