मुख्य सचिव राजेश कुमार यांना मुदतवाढ

राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ते या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार होते. या निर्णयामुळे मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेतील आय.एस. चहल व भूषण गगराणी यांची संधी लांबणीवर पडली आहे.

केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) आज याबाबतची माहिती राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला दिली. त्यामुळे  राजेश कुमार आणखी तीन महिने पदावर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेतील 1988च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले राजेश कुमार हे वयोमानानुसार येत्या 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीला दोन दिवस बाकी असताना त्यांना मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे राजेश कुमार पुढील तीन महिने म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत मुख्य सचिव पदावर कार्यरत राहणार आहेत.