
खडकपूर्णा धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी राज्य सरकारने शब्द दिला होता. परंतु सरकारने विश्वासघात केला. सरकारच्या या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ युवा पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येस सरकार जबाबदार असल्याचे या शेतकऱ्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील युवा पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास अर्जुनराव नागरे यांनी खडकपूर्णा धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी लढा सुरू केला होता. पाण्यासाठी नागरे यांनी दोन ते तीन वेळा आंदोलनही केले. या मागणीसाठी सरकार दरबारी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. डिसेंबरमध्ये एक आठवडा अन्नत्याग आंदोलनही केले. त्यावेळी सरकारच्या वतीने कैलास नागरे यांना मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही.
सरकार फक्त शब्द देते, तो पाळत नाही हे वारंवार दिसून आल्याने कैलास नागरे अस्वस्थ होते. 26 जानेवारी रोजीही त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांनी उपोषण स्थगित केले. पालकमंत्र्यांनी शब्द देऊन दोन महिने उलटून गेले तरी पाणी देण्यासंदर्भात काहीही हालचाली होत नसल्यामुळे 13 मार्च रोजी ऐन होळीच्या दिवशीच कैलास नागरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
तीन पानांची सुसाईड नोट
कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापुर्वी तीन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली. शेतीसाठी सर्व सुविधा असूनही पाणी मिळत नाही. प्रशासन आणि सरकारने वारंवार शब्द देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निदान माझ्या आत्महत्येनंतर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यास माझे बलिदान सार्थ ठरेल असे या चिठ्ठीत म्हटले आहे.
ग्रामस्थांचा संताप अंत्यसंस्कारास नकार
शासन जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत कैलास नागरे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. परिणामी गावात संतापाची लाट उसळली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले. खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यामधून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
“मी त्या शेतकऱ्याबद्दल माहिती घेतली. तो आदर्श शेतकरी होता. पाण्यासाठी त्याने आंदोलनेही केली होती. परंतु त्याचे प्रबोधन करण्यात शासन, लोकप्रतिनिधी कमी पडले का, याचा विचार करावा लागेल. मात्र जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर दोषी अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करण्यात येईल.”
माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री


























































