राज्यात आता दोन दिवस पावसाचे! कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अलर्ट

मॉन्सूनने आता पूर्ण राज्य व्यापले आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार 15 जूनपर्यंत मॉन्सूनने राज्य व्यापले असून आता त्याचा पुढील प्रवास वेगाने सुरू आहे. आता महिन्याअखेरीस मॉन्सून देश व्यापणार आहे. तोपर्यंत उत्तरेकडील काही राज्यांना उकाडाचा त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच आता राज्यात दोन दिवस पावसाचे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून काही भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम करी कोसळतील. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणातील जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सोमवार, मंगळवारी ( 17 व 18 जून रोजी) कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा भागातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. मॉन्सूनने आता राज्य व्यापले असून आठवड्याभरात तो देशाच्या आणखी काही भागात दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मॉन्सूनने मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापलेले आहे. सध्या मॉन्सून नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, मलकानगरी आणि विजयानगरम या भागात आहे. आठवड्याभरात तो ओडिशा, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेशातून पुढील वाटचाल करण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.