कश्मीरमधील पर्यटकांना आणण्याचे काम पुण्यातील गिरीकंद ट्रॅव्हल्सला, मिंध्यांनी लाटले सरकारचे श्रेय? 11 लाख सरकारी तिजोरीतून अदा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील पर्यटकांना विमानाने आणण्याचे काम पुण्यातील गिरीकंद ट्रव्हल्स प्रा. लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. आतापर्यंत पर्यटकांना विमानाने आणण्यासाठी झालेल्या खर्चापोटी 11 लाख 65 हजार 234 रुपयांच्या खर्चास राज्याच्या महसूल विभागाने मान्यता दिली आहे.

या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याच्या विविध भागांतील सुमारे आठशे पर्यटक कश्मीरमध्ये अडकून पडले होते. या पर्यटकांना विमानाने आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार या पर्यटकांना विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. त्यासंदर्भातील बिले गिरीकंद ट्रव्हल्सने राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाला पाठवली होती. त्यानंतर राज्याच्या महसूल विभागाने निधी वितरणास मान्यता दिली आहे.

सरकारी खर्चाने पर्यटकांना आणले

शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी माध्यमांशी बोलताना, पर्यटकांना विमानाने आणण्याची व्यवस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सांगितले. आयुष्यात कधीही न बसलेले लोक पहिल्यांदाच विमानात बसले असे असंवेदनशील वक्तव्यही नरेश मस्के यांनी केले आहे. आता यासंदर्भातील जीआर प्रसिद्ध झाल्यानंतर कश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना एकनाथ शिंदे यांनी आणले की राज्य सरकारच्या खर्चाने आणले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.