
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. त्या सोहळय़ाआधी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार रणकंदन करत विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची कोंडी केली. विरोधी पक्षनेत्याबाबत तातडीने निर्णय घ्या, अन्यथा लोकशाहीचा गळा घोटला जातोय हे सरन्यायाधीशांना सांगावे लागेल, असा इशारा विरोधकांनी दिला. त्यावर कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून निर्णय घेईन, अशा अध्यक्षांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित केला. विधिमंडळात येणाऱ्या सरन्यायाधीशांचे स्वागत विधिमंडळ करेल तेव्हा विरोधी पक्षनेते पद रिक्त असेल. याचा अर्थ विरोधकांच्या वतीने त्यांचे स्वागत होणार नाही. कायदेशीरदृष्टय़ा विधिमंडळाकडून पत्र प्राप्त झाले आहे. विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीसाठी 10 टक्के सदस्यसंख्येची अट कुठेही नाही. दादासाहेब मावळणकर यांच्या काही निर्णयाचा दाखला दिला जात होता, मात्र त्यावरही चर्चा झाली आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.
अध्यक्ष नार्वेकर यांनी यावर आक्षेप घेत बोलण्यास विरोध केला. तरीही जाधव यांनी हा मुद्दा रेटला. आज तुम्ही यासंदर्भात निर्णय घ्या अन्यथा लोकशाहीचा गळा कसा घोटला जातोय हे आम्हाला सरन्यायाधीशांना सांगावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी ‘विरोधी पक्षनेत्यास नियुक्त करण्याचे संपूर्ण अधिकार अध्यक्षांचे आहेत. त्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा करणे कितपत योग्य आहे हे तुम्ही ठरवा,’ असे सुनावले. यासंदर्भात दालनात चर्चा केली आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय घेणार हे सांगितले आहे. पण येथे चर्चा करणे प्रथा-परंपरांसाठी योग्य आहे की नाही हे तुम्ही पहा, असेही सांगितले. तसेच लवकरात लवकर कायदेशीर तरतुदींचा आणि प्रथा-परंपरांचा अभ्यास करून यावर निर्णय घेईन, असे सांगितले, मात्र विरोधकांचे त्यावर समाधान झाले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी ‘सरन्यायाधीशांचे स्वागत करत असताना लोकशाहीच्या परंपरेत विरोधी पक्षनेता नसणे हे योग्य नाही. सहा अधिवेशने होत आली तुम्ही कधी निर्णय घेणार ? असा प्रश्न करत ‘आज, उद्या म्हणजे नेमके कधी करणार हे आता सांगा असा आग्रह धरला.’ त्यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभात्याग करत असल्याचे जाहीर केले. सभात्यागानंतर विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर येऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.