मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट; येलो अलर्ट जारी

मुंबई शहर व उपनगरे तसेच ठाणे जिह्यात उष्णतेची लाट धडकणार असून पारा 39 ते 40 अंशांवर उसळी घेणार आहे. पुढील चार दिवस उष्णतेची लाट असेल. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त उन्हात जाणे टाळून प्रकृतीची काळजी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण परिसरात उष्णतेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात उष्णतेची लाट धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मार्च महिना सुरू झाल्यानंतर मुंबईत उष्णतेचा कहर सुरू झाला आहे. कमाल तापमान 37 अंशांपुढे नोंद होत आहे. गुरुवारी काहीसा दिलासा मिळून तापमान 35 अंशांवर आले होते. मात्र उन्हाचे चटके कायम होते. शुक्रवारी तापमान पुन्हा 36 अंशांवर गेले आणि मुंबईकरांची दमछाक सुरू झाली. शहरात 11 मार्चपर्यंत उष्णतेची लाट असेल, असा अंदाज वर्तवून हवामान खात्याने याबाबत ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. शुक्रवारी सांताक्रुझमध्ये 36 अंश, ठाण्यात 36.6 अंश, पालघरमध्ये 39.7 अंश, तर रत्नागिरीत 37.3 अंश इतके कमाल तापमान नोंद झाले.