…तर आम्ही 228 जागा मागू का? भाजप नेत्याचा सवाल; महायुतीतील संघर्ष चव्हाट्यावर

लोकसभा निवडणुका झाल्या असून एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. मंत्रिमंडळात हवे ते स्थान मिळाले नसल्याने शिंदे गट आणि अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा होती. याबाबतची उघड नाराजीही दोन्ही गटांकडून व्यक्त करण्यात आली होती. आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून जागावाटपावरून महायुतीत संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष चव्हाट्यावर येऊ नये, अशी काळजी महायुतीचे काही नेते घेत आहेत. मात्र, हा संघर्ष आता चव्हाट्यावर आला असून राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे.

महायुतीत सर्व आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असतात. आता त्यात विधानसभेच्या जागावाटपासवरून धुसफूस सुरू झाली आहे. महायुतीत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे नेते विविध दावे आणि वक्तव्ये करत असल्याने महायुतीतील संघर्ष उघड होत आहे. अजित पवार गटातील छगन भुजबळ यांनी महायुतीमध्ये अजित पवार गटाला 80 जागा मिळाल्या पाहिजे, अशी मागणी केली आहे. तसेच शिंदे गटाकडूनही 90 जागांची मागणी होत आहे. त्यातच आता भाजपच्या नेत्यानेही जागावाटपाबाबत दावा केल्याने हा संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, भुजबळ 80 जागा मागायला लागले, तर शिंदे 90 जागा मागतील मग आमचे 105 आमदार आणि अपक्ष असे एकून 114 आमदारांचे संख्याबळ आहे. म्हणून आम्ही 228 जागा मागायच्या का? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी केला. महायुतीतील प्रमुख नेत्यांनी जागावाटपाबाबत जाहीर मेळाव्यात बोलणे हिताचे नाही हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार आहे. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची ज्यावेळी बैठक होईल त्या बैठकीत हा विषय चर्चेत आला पाहिजे आणि त्याची सोडवणूक तिथेच केली पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.