पावसाचा जोर ओसरणार; मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार ऑगस्ट महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणे, नद्या, तलाव भरले आहे. मुंबईचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला आहे. तर मराठवाड्यातही चांगला पाऊश झाला आहे. या महिन्यात झालेल्या पावसाने मराठवाड्याला चांगलाच दणका दिला. या पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आता हवामान खात्याने समाधानकारक अंदाज वर्तवल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

यंदा सरासरीएवढा पाऊस झाल्याने बळीराजाही सुखावला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाचा मराठवाड्याला चांगलाच फटका बसला. आता आणखी पाऊस झाल्यास तो पिकांसाठी चांगला नसल्याने शेतकरी धास्तावला होता. मात्र, आता येत्या 24 तासात पावसाचा वेग ओसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजासह नागरिकानांही दिलासा मिळाला आहे.

अरबी समुद्र आणि लगतच्या भागातील कमी दाबाचा पट्टा नैऋत्येकडे पुढे सरकल्यानं आता राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुसळधार पावसानं मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळत असताना मुंबईत मात्र उकड्याचे वातावरण होते. तसेच अधूनमधून हलक्या सरीही कोसळत होत्या. मुंबईत गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी मध्यम पावसाची नोंद झाली आहे. शहर आणि उपनगरात मधूनमधून हलका ते मध्यम पाऊस/ मेघगर्जनेसह सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.