
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर यांनी माळशिरसच्या जागेवरून भाजपला जबरदस्त टोला लगावला आहे. आपल्याविरोधात अजून कोणीही उमेदवार देण्यात आलेला नाही. तसेच आपल्याविरोधात कोणाचीही उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे बहुदा मी बिनविरोध आमदार होणार, असा टोला उत्तम जानकर यांनी भाजपला लगावला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असणाऱ्या माळशिरस मतदारसंघात यंदा विद्यमान आमदार राम सातपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघाबाबत उत्तम जानकर यांनी आपल्या विरोधात कोणीच रिंगणात उतरणार नाही, असा दावा केला आहे. माळशिरस हा मोहिते पाटील यांचा गड असून गेल्यावेळी मोहिते पाटील भाजपसोबत असल्याने भाजपने पहिल्यांदाच माळशिरस येथे विजय मिळविला होता, असेही जानकर म्हणाले. मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचे 35 वर्षांचे वैर लोकसभा निवडणुकीत संपुष्टात आणण्याचे काम शरद पवार यांनी केले होते. त्यामुळेच माळशिरस येथील लढाई ही शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यातच आता जानकर यांनी भाजपला जबरदस्त टोला लगावला आहे.
जानकर यांच्या दाव्यामुळे महायुतीकडे माळशिरस येथून लढण्यासाठी उमेदवार मिळत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जानकर यांनी यंदा बहुदा मी बिनविरोध आमदार होणार, असा दावा करत भाजपला डिवचले आहे .