महाराष्ट्र साहित्य परिषदेला नाशिकमध्ये भूखंड

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक रोड शाखेला कार्यालयासाठी सवलतीच्या दरात भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न. चिं. केळकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी या संस्थेची स्थापना 1906 मध्ये केली होती. मराठी भाषा-संवर्धनाच्या कार्यात परिषदेने सातत्याने पुढाकार घेतला असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि जागतिक मराठी साहित्य संमेलनासारखे उपक्रम परिषदेने यशस्वीपणे पार पाडले आहेत. याच कार्याची दखल घेऊन देवळाली येथील 1055.25 चौ.मीटरचा भूखंड परिषदेच्या शाखेला देण्यात येणार आहे.

वसई-विरार पालिकेला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जमीन

वसई-विरार शहर महानगरपालिकेला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी मौजे-आचोळे येथील जमीन उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. ही जमीन जिल्हा न्यायालयासाठी व निवासी क्षेत्र म्हणून आरक्षित होती. त्यामुळे हे आरक्षण बदलून जमीन, हॉस्पिटलसाठी हस्तांतरित करण्याचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. जमिनीचा उपयोग केवळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठीच करावा लागणार आहे. तसेच या जमिनीवर अतिक्रमण होऊ न देण्याचे बंधनही महापालिकेला घालण्यात आले आहे.