पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात उष्णतेच्या लाटेपाठोपाठ आता वादळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. सोमवारपासून पुढील पाच दिवस बहुतांश भागांत वादळी वाऱयासह पाऊस तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वादळी पावसाबाबत प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मागील दोन आठवडे राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेला. त्यामुळे नागरिकांची प्रचंड दमछाक झाली. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाचा दिलासा मिळणार आहे. मात्र बहुतांश भागांत वादळी वारे  आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. वादळी पावसाच्या तडाख्याने शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील ठिकठिकाणी सकाळी ढगाळ वातावरण, दुपारनंतर वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होणार आहे.

मुंबईवर पावसाळी ढगांचे साम्राज्य

एकीकडे राज्याच्या ग्रामीण भागात वादळी पावसाचे सावट आहे. याचवेळी मुंबई शहर आणि उपनगरांत रविवारी पावसाळी ढगांची दाटी झाली होती. या ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना उकाडय़ाचा त्रास सहन करावा लागला. दुपारनंतर अधूनमधून ढग आणि तीव्र उन्हाचा लपंडाव सुरू होता. मुंबईकरांनी तीव्र उन्हाच्या झळा आणि उष्ण हवा अशा संमिश्र वातावरणाचा सामना केला. सकाळी सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंद झाले. हवामान खात्याच्या कुलाबा पेंद्रावर 24.7 अंश, तर सांताक्रुझ पेंद्रावर 25.6 अंश किमान तापमान नोंदवण्यात आले.