
मुंबईमध्ये पाऱ्याची घसरण सुरूच असून पारा सलग दुसऱ्या दिवशी 16.6 अंशांवर घसरला आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांतही तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यात ‘दितवा’ चक्रीवादळाचा काय परिणाम होतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र ‘दितवा’चा प्रभाव कमी झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यानुसार आता मुंबईसह राज्यभरात थंडीची लाटेचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यानुसार आता खऱ्या अर्थाने पारा खाली उतरत आहे. मुंबईचा पारा आज 16 अंश सेल्सिअसवर घसरल्याने मुंबईकर सुखद थंडीचा अनुभव घेत आहेत.
13 वर्षांतील सर्वात कमी तापमान
रविवारी रात्री मुंबईने गेल्या 13 वर्षांतील सर्वात कमी म्हणजे 15.7 अंश सेल्सिअस इतके तापमान अनुभवले. एकाच दिवसात हा पारा तब्बल 6.1 अंशांनी खाली घसरला. याआधी नोव्हेंबर 2012 मध्ये किमान तापमान 14.6 अंशी सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते.
यंदाच्या हिवाळ्यात कडाक्याची थंडी
ला–निना आणि तीव्र स्वरूपातील ध्रुवीय चक्रीवादळांमुळे यंदाच्या हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, या वेळी ध्रुवीय चक्रीवादळ, ज्याला पोलर व्होर्टेक्स म्हणतात, स्थिर आणि तीव्र राहणार आहे. त्याच्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी पडते. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत अंटार्क्टिकापेक्षा जास्त थंडी पडली होती. या वेळी हिंदुस्थानात त्याच्या प्रभावामुळे थंडीच्या लाटांचे दिवस वाढणार आहेत.
हवेची गुणवत्ता खालावली!
हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एआयक्यू’ तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत ‘एआयक्यू’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते. 51 ते 100 दरम्यान ‘एआयक्यू’ – ‘समाधानकारक हवा’, 101 ते 200 दरम्यान ‘एआयक्यू’ – ‘मध्यम दर्जाची हवा’, 201 ते 300 पर्यंत ‘एआयक्यू’ – ‘खराब’ हवा समजली जाते. तर 301 ते 400 ‘एआयक्यू’ – ‘अतिशय खराब’ तर 401 ते 500 ‘एआयक्यू’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते. मुंबईत सरासरी ‘एक्यूआय’ सुमारे 200 राहिल्याने मुंबईची हवा आरोग्यासाठी दूषित असल्याचे स्पष्ट होत आहे.


























































