
राज्यातील महानगरपालिकांचे निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर आता 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्रितपणे लढवाव्यात, यासंदर्भात बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी त्यांच्या पक्षाची बैठक झाली. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील ‘गोविंदबाग’मध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.
‘गोविंदबाग’ येथील बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहित पवार, राजेश टोपे उपस्थित होते. शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आम्ही जेथे शक्य आहे, तेथे एकत्रितपणे जिल्हा परिषद-पंचायत समितीची निवडणूक लढविणार आहोत. मात्र, काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढावे, असे वाटेल्यास तशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाण्याची चर्चा झाल्याचे सांगितले. शशिकांत शिंदे म्हणाले, ‘येणाऱया जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितपणे लढविण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलो होतो. विलीनीकरणाचा विषय नव्हता. एकत्र निवडणूक लढविण्यासाठी परवानगी घेण्यासाठी आलो होतो. ज्या पद्धतीने महानगपालिकेला आम्ही एकत्रितपणे सामोरे गेले होतो, त्याच पद्धतीने पुढील निवडणुकांना सामोरे जाण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही शरद पवार यांच्याकडे आलो होतो.
अजित पवारांची सावध भूमिका
दरम्यान, कृषिक प्रदर्शन उद्घाटनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी यासंबंधीच्या प्रश्नावर सावध भूमिका घेतली. ‘स्थानिक पातळीवरील निवडणुकांचा अधिकार स्थानिक पदाधिकाऱयांकडे सोपविला गेला आहे. हे पदाधिकारी त्या-त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतील. आम्ही परिवार म्हणून सुख-दुःखात एकत्र आहोतच,’ असे अजित पवार म्हणाले.
दादा-ताईंची बंद दाराआड चर्चा
‘अटल इन्क्युबेशन सेंटर’ येथे अजित पवार व सुप्रिया सुळे यांची 20 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेसंबंधी खासदार सुळे माध्यमांना म्हणाल्या, ‘मनोमीलनावर तुमचीच चर्चा सुरू आहे. बंद दाराआडची चर्चा बाहेर येते का? जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्यावर चर्चा झाली आहे.’




























































