महारेराचा बिल्डरांना दणका, घरखरेदीदारांच्या नुकसानभरपाईचे 270 कोटी रुपये केले वसूल

महारेरा आतापर्यंत घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईचे सुमारे 270 कोटी रुपये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने वसूल केले आहेत. यात मुंबई उपनगरात 112 कोटी रुपये, मुंबई शहरात 53 कोटी रुपये, पुण्यात 47 कोटी रुपये, ठाणे शहरात 23 कोटी रुपये, अलिबागमध्ये 9.5 कोटी रुपये वसूल केले आहेत. याशिवाय नाशिक 4.90 कोटी, सिंधुदुर्ग 72 लाख, सोलापूर 12 लाख, चंद्रपूर येथे 9 लाख रुपये वसूल करून या जिह्यातील नुकसान भरपाई निरंक झालेली आहे.

20217 साली महारेराची स्थापना झाल्यापासून महारेराने आतापर्यंत 1291 तक्रारदारांच्या नुकसानभरपाईपोटी 792 कोटी रुपयांचे वसुली आदेश जारी केले. यापैकी 103 कोटी रुपयांची प्रकरणे राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर प्रलंबित असल्याने या प्रकरणी वसुलीवर बंधने आहेत. शिवाय महारेरासारख्या अर्धन्यायिक यंत्रणेला (ज्यात सर्वोच्च न्यालयालयासह सर्व न्यायिक यंत्रणा येतात) फक्त प्रकरणपरत्वे वसुलीचे आदेश देण्याचे अधिकार आहेत. प्रत्यक्षात या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला आहेत. म्हणूनच दिलेल्या मुदतीत विकासकांनी नुकसानभरपाई दिली नाही तर ती वसूल करून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असते.