
माजी विश्वस्त आणि पुरातत्व विभागाच्या आक्षेपानंतरही महाशिवरात्रीनिमित्त आद्य ज्योतार्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा ‘शिवार्पणमस्तु’ हा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम घेण्यावर मंदिर प्रशासन ठाम आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात अभिनेत्री किंवा सेलिब्रेटींचे कार्यक्रम आयोजित करून चुकीचा पायंडा पाडू नका, अशी मागणी मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी केली होती. त्यातच मंदिराच्या परिसरात आयोजिलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या परवानगीवरून मंगळवारी पुरातत्व विभागानेही आक्षेप घेतला. त्यावर महाशिवरात्रीला एक दिवस असताना मंदिर प्रशासनाने पुरातत्व विभागाला पत्र पाठवून परवानगीची मागणी केली. मंदिराचे पावित्र्य जपू, पुरातत्व खात्याच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम घेऊ, असे यात म्हटले आहे. मात्र प्राजक्ता माळी यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यास नकार दिला आहे.