
शासकीय कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम जाहीर केला. पण मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभाग नापास झाल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. या सामान्य प्रशासन विभागात कर्मचाऱयांच्या पेन्शन सुधारणा कार्यक्रमापासून अनुपंपा तत्त्वावरील नियुक्त्या, पदोन्नती मस्टर, ग्रेडेशन आणि रँकिंग अशी अत्यंत महत्त्वाची कामे अपूर्ण असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने प्रलंबित कामांच्या सद्यस्थितीबाबत प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी आता सामान्य प्रशासन विभागाने डिसेंबर महिन्याचे टार्गेट दिले आहे.
मंत्रालय व राज्यातल्या विविध जिह्यांतील कार्यालयांना शिस्त लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांची सुधारणा मोहीम सुरू केली होती. ‘क्वालिटी काैन्सिल ऑफ इंडिया’मार्फत शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाला 100 पैकी 24 टक्के गुण मिळाल्याचे उघड झाले आहे. सामान्य प्रशासन विभागाची ढिसाळ कामगिरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या सद्यस्थितीचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केला. सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारितील कोणती कामे पूर्ण झाली आणि कोणती कामे अपूर्ण आहेत तसेच अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी किती काळासाठी मुदत दिली आहे याचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे. एकूण 35 कामांचा तपशील प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार फक्त आठ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित महत्त्वाची कामे अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आठ महिन्यांचा अवधी
विविध अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2025 पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. पेन्शन सुधारण्याचे महत्त्वाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे पेन्शन सुधारणा समजून घेण्यासाठी पेंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभागाच्या आणि अधिकृत विभागाच्या सचिवांच्या भेटी घेण्यात येणार आहेत. अनुपंपा तत्त्वावरील नियुक्त्यांच्या संदर्भात लाभार्थी व प्रमुख प्रशासकीय विभागांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. इतर प्रलंबित कामेही मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱयांशी संबंधित कामे अपूर्ण
सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारित कर्मचाऱयांशी संबंधित अनेक कामे असतात. उदाहरणार्थ पेन्शन सुधारणा, ई-सेवा पुस्तक, विभागीय चौकशी सुधारणा, रजा मोडय़ुल, पदोन्नती मस्टर, सुधारित डीए मॅन्युअल, अनुपंपा नियुक्ती सॉफ्टवेअर, अनुपंपा नियुक्ती जीआर ग्रेडेशन आणि रँकिंग अशी विविध महत्त्वाची कामे आहेत, मात्र ही कामे अपूर्ण असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.