धोनीचा जलवा कायम, हिंदुस्थानी जाहिरात विश्वातील सर्वाधिक विश्वासार्ह ब्रॅण्ड

हिंदुस्थानचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने पाच वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असली तरी त्याचा ‘जलवा’ अद्याप कायम आहे. धोनी आजही हॉट फेव्हरिट असल्यामुळे 2025 मध्ये सर्वाधिक टीव्ही जाहिराती करणाऱ्यांमध्ये थालाने (धोनी) अव्वल नंबर पटकावला आहे. थालाने महान अभिनेते अमिताभ बच्चन, किंग विराट कोहली यांच्यासह अन्य अनेकांना पछाडत टीव्ही जाहिरातींचा विक्रम मोडीत काढला आहे.

टीएएम अॅडएक्सच्या टीव्ही जाहिरात अहवालानुसार जानेवारी ते जून 2025 च्या पहिल्या सहामाहीत धोनी हिंदुस्थानच्या टेलिव्हिजनवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त दिसणारा सेलिब्रिटी म्हणून उदयास आला आहे. ब्रॅण्ड एंडोर्समेंटच्या बाबतीत, धोनीने फक्त सहा महिन्यांत 43 ब्रॅण्डसोबत काम करून यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी 42 ब्रॅण्डचा त्याचा आकडा मागे टाकला आहे. हा आकडा 2024 च्या संपूर्ण वर्षात अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एकूण जाहिरातींपेक्षाही जास्त आहे. 35 जाहिरातींसह ब्रॅण्डच्या संख्येत शाहरुख खान धोनीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तर 28 जाहिरातींसह ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. धोनी दररोज सरासरी 22 तास टीव्ही जाहिरातींमध्ये दिसला, जो सर्व टेलिव्हिजन चॅनेलवरील एकूण जाहिरातींच्या सुमारे 7 टक्के इतका होता. यामुळे तो हिंदुस्थानातील जाहिरात उद्योगातील सर्वात विश्वासार्ह चेहऱ्यांपैकी एक बनला आहे.

सर्वाधिक दृश्यमान टीव्ही सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली आणि राहुल द्रविड यांचा समावेश आहे. द्रविडची सरासरी दैनिक दृश्यमानता 6.4 तास होती आणि कोहलीची 6.3 तास इतकी होती.