ठसा – पद्मभूषण राम सुतार

>> महेश कुलकर्णी

स्वातंत्र्योत्तर काळात शिल्पकलेला नवनवे धुमारे फुटत गेले. त्यातीलच एक स्मारक शिल्प. राम सुतार हे या स्मारक शिल्पांच्या इतिहासातील सोनेरी पान. स्मारक शिल्पे साधारणतः मानवी भावनांशी निगडित असतात. या भावना शिल्पात तंतोतंत उतरवणे ही राम सुतार यांची खासियत. म्हणूनच त्यांची शिल्पे देशविदेशात कौतुकास पात्र ठरली. भव्यदिव्य शिल्प आकाराला आणणे हे तसे कठीणच. त्यातही ते स्मारक शिल्प असेल तर त्यातील भावभावनांचा हिंदोळा टिपणे त्याहूनही कठीण, परंतु राम सुतार यांनी आपल्या अथक मेहनतीने स्मारक शिल्पांना राजाश्रय तर मिळवून दिलाच, त्यापेक्षा काकणभर लोकाश्रय जास्त मिळवून दिला. संसद भवनाच्या आवारातील मौलाना अबुल कलाम आझाद, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पंडित गोविंद वल्लभ पंत, बाबू जगजीवनराम आणि अलीकडेच त्यांनी गुजरातेत उभारलेला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा उत्तुंग पुतळा त्यांच्या अपार श्रमाची साक्ष देतात. महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मनोहारी शिल्पे सुतार यांनी घडवली. टोकियोतील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळाही असाच भव्यदिव्यतेची साक्ष देणारा.

राम सुतार यांनी स्मारक शिल्पांबरोबरच भित्तीशिल्पांनाही जगमान्यता मिळवून दिली. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कर्तृत्वाची महती सांगणारे एक भव्य भित्तीशिल्प राम सुतार यांनी साकारले आहे. पुरातत्व खात्यात नोकरी करत असताना साधारण 1952 ते 58 या काळात राम सुतार यांनी अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमधील भग्न शिल्पांच्या डागडुजीचे काम केले. येथेच त्यांची स्मारक शिल्पाची प्रतिभा विलसत गेली. दगड आणि संगमरवरातील शिल्पकामात त्यांचा हातखंडा होता. ब्राँझ धातूत शिल्पकाम करण्याचीही त्यांना आवड होती.

राम सुतार यांचा जन्म धुळे जिह्यातील गोंडूर येथला. ते आठ वर्षांचे असताना महात्मा गांधी गोंडूरला आले होते. गांधी विचारांशी जुळलेला हा ऋणानुबंध त्यांच्या शिल्पकलेला प्रोत्साहन देणारा ठरला. सुतार यांचे शिल्पकलेतील कसब हेरून त्यांच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी त्यांना महात्मा गांधी यांचा पुतळा बनवण्यास सांगितले. महात्मा गांधींचे हुबेहुब शिल्प साकारल्याबद्दल त्यांना शंभर रुपयांचे बक्षीसही मिळाले होते. 1948 ची ही घटना. चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाजवळ राम सुतार यांनी उभारलेले एक शिल्प आहे. चंबळा आणि तिला बिलगलेली दोन बालके अशी या शिल्पाची संकल्पना. ही दोन बालके म्हणजे मध्य प्रदेश आणि राजस्थान. हे शिल्प हा राम सुतार यांच्या शिल्पप्रवासातील आदर्श मानला जातो. तेव्हापासून सुरू झालेला हा शिल्पप्रवास वयाच्या शतकोत्तरीतही अव्याहत चालू होता.

गुजरातेतील सरदार सरोवरावर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा निर्णय झाला, त्या वेळी आपसूकच राम सुतार यांचेच नाव समोर आले. हा पुतळा उभारताना राम सुतार यांच्या शिल्पकलेतील तपश्चर्येची कसोटीच लागली. या पुतळय़ाचे बहुतांश भाग चीनमध्ये बनवण्यात आले. एल अँड टी कंपनीने सरोवराकाठी काँक्रिटचा प्रचंड मोठा ब्लॉक बांधला. त्यातूनच लिफ्टची सोय करण्यात आली. ब्लॉकच्या बाजूने कास्टिंग केलेले भाग जोडण्यात आले. त्यासाठी महाकाय क्रेन्सचा वापर करण्यात आला. पुतळय़ाच्या सर्व भागांची जुळणी झाली. हे सर्व काम होत असताना राम सुतार त्या ठिकाणी ठाण मांडून होते. त्या वेळी त्यांचे वय होते 94 वर्षे. सरदार वल्लभभाईंचे पुतळे अनेक आहेत, परंतु या ठिकाणी असलेल्या पुतळय़ात वल्लभभाईंचा करारीपणा जिवंत करण्यात राम सुतार यांनी आपले सगळे कसब पणाला लावले. राम सुतार यांचे वडील वनजी हे लाकडी वस्तू तसेच शेतीची अवजारे बनवायचे. कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे कौशल्य ते आपल्या वडिलांकडूनच शिकले. 1953 मध्ये त्यांनी शिल्पकलेतील पदविका मिळवली. शिल्पकलेतील अतिशय कठीण असलेल्या प्रतिरूपणासाठी त्यांना प्रतिष्ठsचे मेयो सुवर्णपदक मिळाले. प्रमिला चिमठणकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शिल्पकलेचा वारसा चालवणारे राम सुतार साहित्य कला परिषद, बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रतिष्ठत पुरस्काराचे मानकरी ठरले. अलीकडेच त्यांना महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरवले. ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. समृद्ध कलाजीवन जगून हा शिल्पी अनंताच्या प्रवासाला निघून गेला. राम सुतार यांच्या जाण्याने शिल्पकलेच्या विश्वात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे.