बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी योग्य नियोजन करा! शिवसेनेची पोलिसांकडे मागणी

येत्या 17 ऑगस्ट रोजी अनेक सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे धूमधडाक्यात गणसंपुल आणि परळ रेल्वे वर्कशॉप मैदानातून आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन करावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.

लालबागमध्ये रविवारी गणेश आगमन सोहळ्यात गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली. चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या पार्श्वभूमीवर शिवडी विधानसभेच्या वतीने काळाचौकी पोलीस ठाण्यात आमदार अजय चौधरी आणि दगडू सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भोईवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त घनश्याम पलंगे आणि काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मनीष श्रीधनकर यांची भेट घेतली. येत्या 17 ऑगस्ट रोजी अनेक सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे आगमन गणसंपुल आणि रेल्वे वर्पशॉप मैदानातून होणार आहे. त्यावेळी भोईवाडा आणि काळाचौकी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात करावा,  अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर पोलिसांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. या शिष्टमंडळात शिवडी विधानसभेतील सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.