
‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’, ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’पासून ते ‘शहीद भगतसिंग’, ‘सरदार’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘उरी’, ‘दंगल’, ‘संजू’ अशा गाजलेल्या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा आपल्या रंगभूषेच्या कलेने रुपेरी पडद्यावर जिवंत करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विक्रम गायकवाड यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना गायकवाड आणि मुलगी तन्वी गायकवाड असा परिवार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विक्रम गायकवाड हे आजारी होते. कोरोनामध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारी होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे त्यांना पवईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गायकवाड यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली.
मेकअप मास्टर! बबनराव शिंदे हे माझे गुरू. मी सातवीत असताना ते मला शाळेत मुलांच्या मेकअपसाठी घेऊन जायचे. त्यांनी सांगितल्यानुसार मी मुलांना मेकअप करायचो. पुण्यातल्या सगळय़ा मुलींच्या शाळेत मी मेकअपसाठी जायचो, अशी आठवण विक्रम गायकवाड यांनी सांगितली होती. पुढे त्यांनी फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये मेकअपचे धडे गिरवले. आंजी बाबूंबरोबर रंगभूषाकार म्हणून एफटीआयआयमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘पवळा’ या मराठी चित्रपटासाठी रंगभूषा करण्याची संधी त्यांना मिळाली.
‘जाणता राजा’ करिअरसाठी ठरले माईलस्टोन
सुरुवातीच्या काळात विक्रम गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक नाटकाची रंगभूषादेखील केली होती. या नाटकात असंख्य व्यक्तिरेखा असल्यामुळे नाटक सुरू असताना काही क्षणात मेकअप करण्याचे आव्हान आमच्यापुढे होते. त्यामुळे आमचा हात विजेच्या चपळाईने तयार झाल्याचे ते सांगायचे.
‘सरदार’ने दिली ओळख
विक्रम गायकवाड यांनी ग्लॅमर मेकअपपेक्षा पॅरेक्टर मेकअपला प्राधान्य दिले. हिंदुस्थानात प्रोस्थेटिक मेकअपचा ट्रेंड आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्याम बेनेगल यांच्या ‘सरदार’ या चित्रपटाद्वारे त्यांना मोठा ब्रेक मिळाला. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटात त्यांनी दाक्षिणात्य अभिनेता मामुटी यांना आंबेडकरांच्या रूपात आणण्याची किमया केली. ‘पानिपत’, ‘बेल बॉटम’, ‘उरी’, ‘ब्लॅकमेल’, ‘दंगल’, ‘पीके’’, ‘सुपर 30’, ‘केदारनाथ’, ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’, ‘शहीद भगतसिंग’’, ‘थ्री इडियट्स’, ‘भाग मिल्खा भाग’ अशा बॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटांसोबत मराठीतील ‘बालगंधर्व’ आणि ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’, ‘लोकमान्य’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज है’ अशा अनेक ऐतिहासिक चित्रपटांसाठी रंगभूषाकार म्हणून काम केले. 2013 साली त्यांनी केलेल्या बंगाली सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.