
‘मनमोहन सिंग हे तळागाळातून आलेले अनुभवी नेते होते. त्यांनी पंतप्रधान म्हणून जे काम केलं, त्याच्या 10 टक्केही काम मोदींच्या सरकारला करता आलेलं नाही,’ अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
डॉ. मनमोहन सिंग फेलोशिप प्रोग्राममध्ये खरगे बोलत होते. शांतपणे काम करण्याच्या मनमोहन सिंग यांच्या स्वभावाचे त्यांनी कौतुक केले. ‘मनमोहन सिंग हे न बोलता काम करणारे पंतप्रधान होते. जो माणूस तळागाळातून वर येतो, शिपूनसवरून मोठा होतो आणि लोकांना तयार करतो, त्याचा अनुभव मोठा असतो. मनमोहन सिंग त्यातले नेते होते. मात्र हल्ली वातावरण बदलले आहे. आजचे पंतप्रधान काम कमी करतात आणि प्रचार, गाजावाजा जास्त करतात. त्यांच्या बोलण्याला भुलून लोक तिकडं आकर्षित झाले खरे, पण त्यांना हवा तो रिझल्ट मिळाला नाही. आता लोकांची निराशा झाली आहे, असे खरगे म्हणाले.
‘संसदेच्या अधिवेशन काळात मनमोहन सिंग नेहमी सभागृहात उपस्थित असायचे. प्रश्नोत्तराच्या तासाला बसायचे. सदस्यांची भाषणे ऐकायचे. प्रश्नांची उत्तरे द्यायचे. एखाद्या विषयावर निवेदन द्यायची गरज वाटल्यास तेही द्यायचे. याउलट आताचे पंतप्रधान सभागृहात येतच नाहीत. त्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण ऐकावे लागते,’ असा चिमटा खरगे यांनी काढला.
फक्त पब्लिसिटीनं कामं होत नाहीत. अल्ला के नाम पे… भगवान के नाम पे… असं म्हणून सगळं काही मिळत नाहीत. कष्ट करावे लागतात, पण हल्ली असे लोक राजकारणात आहेत, ज्यांना जनतेची चिंता नाही. लोकांच्या प्रती बांधिलकी नाही.’




























































