एलपीजी संकटाची चाहूल लागली, असतानाही उपाय का केले नाहीत? गॅस टंचाईवरून विरोधकांनी राज्यसभेत सरकारला घेरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-अमेरिका युद्ध भडकल्यास देशात एलपीजी गॅसची टंचाई होऊ शकते याची कल्पना सरकारला आली होती, तर मग वेळीच उपाययोजना का केल्या नाहीत, जनतेला विश्वासात का घेतले नाही,’ अशा प्रश्नांचा भडिमार करत विरोधकांनी आज राज्यसभेत सरकारला घेरले.

राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच गॅस टंचाईचा मुद्दा उपस्थित केला. गॅसअभावी देशात सुरू असलेली पळापळ, लोकांना होणारा त्रास, वाढलेली महागाई, काळाबाजार याकडे खरगे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ‘गॅसची कुठलीही टंचाई नाही, अफवा पसरवू नका, असे पेट्रोलियम मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. गॅस सिलिंडरसाठी लोक रांगेत उभे आहेत. हॉटेलं बंद आहेत. शहरात 25 दिवसांनी आणि गावांमध्ये 45 दिवसांनी सिलिंडर मिळत आहे. काळ्या बाजारात सिलिंडरचा भाव 5 हजारांवर गेला आहे. हे संकट सरकारचे अपयशी परराष्ट्र धोरण आणि ढिसाळ नियोजनाचा परिणाम आहे,’ असा हल्ला खरगे यांनी चढवला.

विरोधाची पद्धत बदला; देवेगौडांचे सोनिया गांधींना पत्र

माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी काँगेस नेत्या सोनिया गांधी यांना पत्र पाठवून सरकारला विरोध करण्याची पद्धत बदलण्याचा सल्ला दिला आहे. ’विरोधी पक्ष म्हणून तुम्ही सरकारविरोधी भूमिका जोरकसपणे जरूर मांडा. मात्र, ती मांडण्याची पद्धत बदला. गेल्या 75 वर्षांत विविध सरकारांनी केलेल्या कामाला गालबोट लागेल असे काही करू नका,’ असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरळीत

संसदेतील गदारोळाची सवय झालेल्या नागरिकांसाठी आज लोकसभेने सुखद आश्चर्याचा धक्का दिला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध सुरू झाल्यापासून गदारोळामुळे लोकसभेत एकदाही प्रश्नोत्तराचा तास पूर्ण होऊ शकला नव्हता. आज मात्र तो सुरळितपणे पार पडला.

विवाहित जोडप्यांना संयुक्त आयटीआर भरू द्या

विवाहित जोडपे संसाराची जबाबदारी संयुक्तपणे पार पाडत असते. त्यांना आयटीआर संयुक्तपणे भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी आज केली.

तृणमूल काँगेसचा सभात्याग

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ तृणमूल काँगेसने आज राज्यसभेत सभात्याग केला.

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता का नाही… शिवसेनेचे स्मरण पत्र

विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना स्मरणपत्र दिले. यावेळी शिवसेना विधिमंडळ गटनेते आदित्य ठाकरे, विधानसभा गटनेते भास्कर जाधव, विधान परिषद गटनेते अॅड. अनिल परब, आमदार अजय चौधरी, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, महेश सावंत, पैलास पाटील, संजय देरकर उपस्थित होते.