मालवणीत गॅस एजन्सीच्या मालकाला धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाडच्या मालवणी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवडय़ामुळे ग्राहकांच्या संतापाचा भडका उडाला. सहा ते आठ तास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर गोंधळ घातला. यावेळी संतप्त ग्राहकांनी एजन्सी मालकाला धक्काबुक्कीही केली.

मालवणी येथील राठोडी गॅस एजन्सीबाहेर सकाळी 6 वाजल्यापासून नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली, मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत रांगेत उभे राहूनही एजन्सीकडून सिलिंडरचे वितरण होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटला. मोबाईलवर सिलिंडरचे बुकिंग झाल्याचे मेसेज येऊन 15 दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याने कर्मचाऱयांना जाब विचारला. यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त करत कर्मचाऱयांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी एजन्सीचे मालक मध्यस्थी करण्यासाठी आले असता जमावाने त्यांनादेखील धक्काबुक्की करत जाब विचारला. अखेर याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले.