
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. “जर तुम्हाला पुढची पाच वर्षे शांततेत जगायचे असेल, तर भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे,” असे आवाहन त्यांनी मालदा येथील माणिकचक येथील जाहीर सभेत केले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप देशाला विनाशाकडे घेऊन जात आहे. ते कोणत्याही धर्माचा आदर करत नाहीत, तर स्वतः तयार केलेला धर्म लोकांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्याकडे मां कालीच्या प्रसादात मासे आणि मांस दोन्ही असते. भाजप कोणत्या धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे? त्यांनी आधी बंगालची संस्कृती समजून घ्यावी,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली.
सभेत बोलताना त्यांनी आरोप केला की, एनआयए (NIA), सीबीआय (CBI), ईडी (ED), बीएसएफ (BSF) आणि सीआयएसएफ (CISF) यांसारख्या केंद्रीय यंत्रणा मोटा भाईंच्या (अमित शहा) नियंत्रणाखाली आहेत. आमच्या उमेदवारांना ईडी आणि सीबीआयचे समन्स पाठवून धमकावले जात आहे, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत पार पडणार असून, ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.


























































