जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी तरुणीचे मॉर्फ फोटो व्हायरल केल्या प्रकरणी एकाला धारावी पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.तक्रारदार तरुणी ही धारावी परिसरात राहते. गेल्या महिन्यात तिचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल झाले होते. तसेच एक मॉर्फ फोटोत तिच्या शिक्षकांनादेखील टॅग केले होते. हा प्रकार समजताच तरुणीला धक्काच बसला. घडल्या प्रकरणी तिने धारावी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक संजय पुजारी, उपनिरीक्षक सागर खाडे आणि पथकाने तपास सुरू केला.
तपासा दरम्यान पोलिसांनी सोशल मीडियावरील त्या खात्याची माहिती काढली. ते खाते एक तरुणी वापरत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांचे पथक वसई येथे गेले. तेथे तरुणीची चौकशी केली. चौकशी दरम्यान काही माहिती समोर आली. दीड वर्षापूर्वी अटक आरोपीने त्या तरुणीचा नंबर मिळवला. चित्रनगरीत काम देतो असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. भुलथापा मारून मोबाईलवर आलेला ओटीपी त्याने घेतला. त्या ओटीपीच्या माध्यमातून त्याने बनावट नावाने सोशल मीडियावर अकाउंट उघडले होते. त्याच दरम्यान पोलिसांना आणखी एक माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अटक आरोपीला ताब्यात घेतले. त्याने मॉर्फ पह्टो अपलोड करण्यासाठी दुसऱया व्यक्तीच्या इंटरनेटचादेखील वापर केला होता. कसून चौकशी केल्यावर त्याने तो मॉर्फ पह्टो व्हायरल केल्याची कबुली दिली. जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी त्याने ते कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.